जत तालुक्यातील मायथळ येथे कौटुंबिक वादातून आईने दीड वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेतल्याची घटना. आई आणि मुलीचा मृत्यू; उमदी पोलिसांचा तपास सुरू.
जत : मायथळ (ता. जत) येथील सोलनकर वस्तीवर कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीला ओढणीने पोटाशी बांधून विहिरीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (६ ऑक्टोबर) घडली. या घटनेत नीता गजानन सोलनकर (वय २९) आणि त्यांची दीड वर्षांची मुलगी अवनि यांचा मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नीता सोलनकर यांचे माहेर वळसंग (ता. जत) असून, सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांचा गजानन सोलनकर यांच्याशी विवाह झाला होता. गजानन हे ट्रकचालक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून नीता आणि त्यांच्या कुटुंबात कौटुंबिक वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मायथळ येथील सोलनकर वस्तीपासून काही अंतरावर अवधूत सोलनकर यांची विहीर आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे ही विहीर सध्या भरलेली होती. नीताने मुलीला सोबत घेऊन या विहिरीत उडी घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पोलिस पाटील उत्तम भंडे यांना कळविले. त्यानंतर उमदी पोलिसांना माहिती देण्यात आली. विहीर खोल असल्याने सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. सुमारे ४० बाय ६० फूट आकाराच्या विहिरीत शोधमोहीम राबवून काही वेळातच आई आणि मुलीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
रेस्क्यू फोर्सचे सीनियर कमांडर कैलास वडर, कमांडर महेश गव्हाणे तसेच सागर जाधव, आमीर नदाफ, ईर्शाद कवठेकर, आसिफ मकानदार, लहू घोरपडे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस उपाधीक्षक सचिन थोरबोले आणि सहाय्यक पोलिस अधिकारी गणेश वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उमदी पोलिस ठाण्याचे गणेश वाघमोडे पुढील तपास करीत आहेत.
घटनेनंतर सासूला मारहाण
घटनेनंतर नातेवाइकांनी नीता यांच्या सासू रखूबाई आप्पासाहेब सोलनकर यांना मारहाण केल्याची माहिती आहे. त्यावेळी नीता यांचे पती गजानन सोलनकर घटनास्थळावरून निघून गेल्याचे समजते. ते पसार असल्याची चर्चा असली, तरी याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, नीता या गर्भवती असल्याची माहितीही समोर आली असून, त्याबाबत अधिकृत वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्टता होणार आहे. कौटुंबिक वादाची नेमकी पार्श्वभूमी आणि घटनेमागील कारणांचा उमदी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
