सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; मिरज-पंढरपूर मार्गावर ३०० किलो गांजा जप्त. कंटेनरसह १ कोटी ७५ लाख १० हजारांचा मुद्देमाल ताब्यात.
सांगली : अंमली पदार्थ तस्करीविरोधात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ३०० किलो तयार गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह अशोक लेलँड कंटेनर आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ७५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) मिरज-पंढरपूर मार्गावरील तानंग फाटा ते मालगाव रस्त्यावर करण्यात आली. sangli crime
सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मंगेश मोरे (रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) हा अशोक लेलँड कंटेनर क्रमांक NL-01-AD-9366 मधून गांजाची वाहतूक करणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित कंटेनर ताब्यात घेतला.

कंटेनरच्या ड्रायव्हर केबिनमधील एका कप्प्यात खाकी रंगाच्या चिकटपट्टीने घट्ट गुंडाळलेली १५० पाकिटे आढळून आली. प्रत्येक पाकिटाचे वजन अंदाजे दोन किलो असून एकूण वजन सुमारे ३०० किलो असल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचांसमक्ष तपासणी केली असता पाकिटांमध्ये हिरवट-काळसर रंगाचा फुलबोंडे असलेला तयार गांजा आढळून आला.
चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीने हा गांजा ओडिशा राज्यातील चालेगोडा ते तुंबडी परिसरातील एका शेतातून आणल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. हा माल पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहितीही त्याने दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
असा आहे जप्त मुद्देमाल
* ३०० किलो गांजा — अंदाजे किंमत १ कोटी ५० लाख रुपये
* अशोक लेलँड १६१८/४ सहाचाकी कंटेनर — अंदाजे किंमत २५ लाख रुपये
* रेडमी कंपनीचा मोबाईल — अंदाजे किंमत १० हजार रुपये
* एकूण मुद्देमाल — १ कोटी ७५ लाख १० हजार रुपये
या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये कलम ८(क), २०(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला गांजा नेमका कुठे विक्रीसाठी नेण्यात येत होता, तसेच या तस्करीच्या मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगलीच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
