जत

जत शहरातील हिंदू स्मशानभूमीचे काम निधीअभावी ठप्प असून स्वच्छतेचा व सुविधांचा अभाव दिसून येतो. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप.

जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जत-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिंदू स्मशानभूमीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जत नगरपरिषदेने जुन्या, जीर्ण झालेल्या स्मशानभूमीच्या जागी लाखो रुपये खर्च करून नवीन आर.सी.सी. स्मशानभूमीची उभारणी केली असली तरी, आजही तेथे अपूर्ण कामेच नागरिकांच्या डोळ्यासमोर उभी आहेत.

स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना ना पावसापासून संरक्षण, ना उन्हापासून आराम — अशा परिस्थितीत त्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नगरपरिषदेने लोकांसाठी बसण्याची किंवा थांबण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही, ही बाब सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करणारी ठरली आहे.

जत


सहा महिन्यांपासून निवारा शेडचे काम ठप्प

जत नगरपरिषदेने सुमारे सहा महिन्यांपूर्वी आर.सी.सी. कॉलम घेऊन बाल्कनी आणि निवारा शेडचे काम हाती घेतले होते. परंतु, निधीअभावी हे काम आजही ठप्प आहे. काम सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच ठेकेदारांनी साधनसामग्री जागेवर ठेवून काम बंद केल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. परिणामी, पावसाळ्यात ओले होणे आणि उन्हाळ्यात कडक उन्हात उभे राहणे हेच स्मशानभूमीत येणाऱ्यांचे वास्तव झाले आहे.

हेदेखील वाचा: जत आखाडा मिनी मंत्रालयाचा! – दरीबडची जिल्हा परिषद गटात तगडी राजकीय रंगत


स्मशानभूमीत अस्वच्छतेचा साम्राज्य

स्मशानभूमी परिसरात सर्वत्र काटेरी झाडे, गवत व कचरा पसरलेला दिसतो. योग्य देखरेख नसल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे जुनी साधनसामग्री व साहित्याची पूर्णपणे वाट लागली आहे. अशा परिस्थितीत, मृतांच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना अस्वच्छ वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे.

जत


नागरिकांची मागणी : “काम तातडीने पूर्ण व्हावे”

ज-त शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेच्या निष्क्रिय कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की,

“स्मशानभूमी ही श्रद्धेचे ठिकाण आहे. येथे येणाऱ्या लोकांसाठी मूलभूत सुविधा असाव्यात. नगरपरिषदेने निधीअभावी सांगून काम थांबवले असले तरी, येणाऱ्या उन्हाळ्यापूर्वी निवारा शेड व बाल्कनीचे काम तातडीने पूर्ण करावे.”


नागरिक करातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग शहरातील आवश्यक ठिकाणी व्हावा, हीच अपेक्षा असते. परंतु ज-त नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे हिंदू स्मशानभूमीचे अपूर्ण काम आणि अस्वच्छता हे प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचे द्योतक ठरत आहे.
श्रद्धास्थानाची ही दुरवस्था संपवून, स्मशानभूमीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *