जत येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक जतकन्या केंद्रशाळेत पाच दिवसीय हिवाळी संस्कार शिबिर उत्साहात सुरू. योगासने, कागदकाम, तबला संगीत, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांत विद्यार्थ्यांचा सहभाग.
जत : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याबरोबरच त्यांच्यात विविध कौशल्ये, सर्जनशीलता आणि संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने जत येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक जतकन्या केंद्रशाळेत पाच दिवसीय हिवाळी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत सकाळच्या सत्रात सुरू असलेल्या या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या शिबिरात योगासने व प्राणायाम, कार्यानुभवांतर्गत कागदकाम, तबला संगीत, विविध क्रीडा स्पर्धा, संगीत खुर्ची आणि गरबा नृत्य अशा विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळत आहे.

शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रभाकर गायकवाड यांनी योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लहान वयापासून योगासने आणि प्राणायामाची सवय लावल्यास उत्तम आरोग्य लाभण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या दिवशी तोहीद मुजावर यांनी कार्यानुभवांतर्गत कागदकाम हा उपक्रम घेतला. विद्यार्थ्यांनी कागदापासून टोप्या, होड्या, कंदील अशा विविध आकर्षक वस्तू तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला वाव मिळाला.
तिसऱ्या दिवशी धनाजी केंगार आणि चंद्रकांत देवकुळे यांनी तबला संगीत या विषयावर मार्गदर्शन केले. तबला आणि हार्मोनिअम या वाद्यांची माहिती देतानाच त्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. लहानपणापासून विविध छंद जोपासल्यास त्याचा फायदा भविष्यातील आयुष्यात होतो, असे चंद्रकांत देवकुळे यांनी सांगितले.

या वेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा किशोरी यादव, श्रुती कोळी, संतराम गुरव, लेखक मच्छिन्द्र ऐनापुरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक जैनुद्दीन नदाफ यांनी केले. रणवीर कांबळे यांनी आभार मानले, तर शीतल कसबे यांनी सूत्रसंचालन केले.
या उपक्रमाला जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राम फरकांडे, शिक्षण विस्ताराधिकारी अन्सार शेख, दिलीप वाघमारे, तानाजी गावाची आणि केंद्रसमन्वयक सुनील बाबर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक जैनुद्दीन नदाफ, रणवीर कांबळे, विक्रम मुंडले आणि शीतल कसबे यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.
