जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना कार्यक्रमांत सहभागी होता यावे, यासाठी २, ३ व ५ डिसेंबरच्या PAT-२ परीक्षा ३ डिसेंबरनंतर घेण्याचे दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे निर्देश.
पुणे : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे, यासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणीच्या वेळापत्रकात बदल करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने दिले आहेत. त्यानुसार २, ३ व ५ डिसेंबर २०२६ रोजी नियोजित असलेल्या संकलित मूल्यांकन चाचणी-१ (PAT-२) परीक्षा ३ डिसेंबरनंतर घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरवर्षी ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो. यानिमित्त २ ते ५ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये रॅली, मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृतीपर उपक्रमांचा समावेश असतो. या कार्यक्रमांमध्ये दि-व्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.

मात्र, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील नियतकालिक मूल्यांकन चाचणीअंतर्गत संकलित मूल्यांकन चाचणी-१ (PAT-२) याच कालावधीत नियोजित करण्यात आली होती. त्यामुळे दि-व्यांग विद्यार्थ्यांना जागतिक दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती.
हेदेखील वाचा : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते. या मागणीची दखल घेत दिव्यांग कल्याण आयुक्त सत्यजीत बडे (भा.प्र.से.) यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथील सहसंचालकांना पत्र पाठवून संबंधित परीक्षा ३ डिसेंबरनंतर घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याबाबत क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यक सूचना देण्यास सांगितले आहे.
विद्यार्थ्यांना कार्यक्रमांत सहभागी होता येणार
या निर्णयामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण न घेता जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये सहभागी होता येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सहभागाला प्राधान्य देत परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. आता संबंधित शैक्षणिक यंत्रणेकडून सुधारित परीक्षा वेळापत्रक कधी जाहीर केले जाते, याकडे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
