Kolhapur Crime News

Kolhapur Crime News : भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी कड्यावरून २५० फूट खोल दरीत पडलेल्या तरन्नूम नाईकचा मृतदेह आढळला. खुनाच्या आरोपाखाली श्रीपाद वडरला अटक.

कोल्हापूर : दुसऱ्या तरुणासोबत लग्न ठरल्याने भेटण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रेयसीला दुर्गम ठिकाणी बोलावून कड्यावरून खोल दरीत ढकलून खून केल्याचा धक्कादायक प्रकार भुदरगड तालुक्यातील शिवडावजवळ उघडकीस आला आहे. तरन्नूम बशीर नाईक (वय २२, मूळ रा. पाटगाव, सध्या रा. गारगोटी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी श्रीपाद दिनकर वडर (वय २५, रा. अवधूत कॉलनी, गारगोटी) याला भुदरगड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरन्नूम आणि श्रीपाद हे एकमेकांच्या घरासमोर राहत असल्याने त्यांची ओळख होती. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. तरन्नूम अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. दरम्यान, सुमारे चार महिन्यांपूर्वी तिचे दुसऱ्या तरुणासोबत लग्न ठरले. त्यानंतर तिने श्रीपादला भेटण्यास टाळाटाळ सुरू केली होती. याच कारणावरून श्रीपादने तिला नाईकवाडी येथील कड्यावर भेटण्यासाठी बोलावल्याचा आरोप आहे.

शुक्रवारी (ता. ९) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास दोघे नाईकवाडी कड्यावर गेले होते. तेथे तरन्नूमने लग्न ठरल्यामुळे यापुढे भेटणार नसल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या श्रीपादने तरन्नूमला कड्यावरून खोल दरीत ढकलून दिल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

आईची अपहरणाची तक्रार; चौकशीत गुन्हा उघड

शुक्रवारी सायंकाळपर्यंत तरन्नूम घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईने भुदरगड पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी श्रीपादवर संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी त्याला रात्री ताब्यात घेऊन चौकशी केली.

चौकशीदरम्यान श्रीपादने दोघे फिरायला नाईकवाडी कड्यावर गेल्याचे सांगितले. तरन्नूम पाणी आणण्यासाठी गेली आणि त्यानंतर ती कुठे गायब झाली, हे समजले नसल्याचा दावा त्याने केला. मात्र, त्याच्या जबाबातील विसंगती लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळी नेऊन चौकशी केली. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेदेखील वाचा: ‘चला शाळेत जाऊया’ अभियान; शाळांची गुणवत्ता आणि सुविधांचा आढावा ; शालेय शिक्षण मंत्री भुसे यांच्या कोकणातील शाळांना भेटी; गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणावर भर

२५० फूट खोल दरीत शोधमोहीम

तरन्नूमचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासून मोहीम सुरू केली. शनिवारी आंबोली येथील बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. रोपच्या साहाय्याने सुमारे २५० फूट खोल दरीत उतरून चार ते पाच तास शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतर तरुणीचा मृतदेह आढळला. बचाव पथकाने मृतदेह दरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठविला.

भुदरगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अली मुल्ला, आमीर नदाफ, स्वप्नील मोरे, तानाजी डवरी, विकास कांबळे आणि शीतल पाडेकर यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला. या घटनेमुळे गारगोटी परिसरासह भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed