कासेगाव

२४ तासांत कासेगाव खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

आयर्विन टाइम्स / कासेगाव
वाळवा तालुक्यातील कासेगाव (जि. सांगली) येथील पांडुरंग भगवान शिद (वय ४३) यांचा खून करणाऱ्या तिघांना पोलिसांच्या पथकांनी जेरबंद केले. अनैतिक संबंधाच्या संशयावरून सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. यातील खुनाची सुपारी देणारा संशयित सुरेश नारायण ताटे (४५, लोणार गल्ली, इस्लामपूर) याच्यासह हल्लेखोर संशयित विशाल जयवंत भोसले (२५, कामेरी), शिवाजी भीमराव भुसाळे (३७, मूळ गाव उजळम, ता. बसवकल्याण, जि. बिदर कर्नाटक, सध्या महादेवनगर, इस्लामपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. २४ तासांत खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

कासेगाव

पांडुरंग भगवान शिद यांचा अनोळखींनी गोळ्या झाडून खून केला

कासेगाव येथील सावकाराचा खून कोणी आणि कोणत्या कारणावरून केला, याबाबत कोणतीही प्राथमिक माहिती पोलिसांकडे उपलब्ध नसल्याने या गुन्ह्याचा छडा लावणे, हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. इस्लामपूर पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी (ता. १६) सकाळी साडेसात-आठच्या सुमारास कासेगाव-वाटेगाव शिवेच्या रस्त्याकडेला पांडुरंग भगवान शिद यांचा अनोळखींनी गोळ्या झाडून खून केला होता. याप्रकरणी कासेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शशिकांत महादेव शिद (४४, कासेगाव) यांनी फिर्याद दिली होती.

हे देखील वाचा: Women’s Health / महिलांचे आरोग्य: जाणून घ्या आव्हाने, उपाय आणि काळजी; 6 मुद्द्यांवर करा फोकस…

सहा लाख रुपयांची सुपारी

या गुन्ह्याबाबत पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिलेली माहिती अशी की, या खुनात पिस्तूलचा वापर केल्याने हे प्रकरण गंभीर होते. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, अधीक्षक संदीप घुगे यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. हा खून कोणी आणि कोणत्या कारणावरून केला, याबाबत कोणतीही प्राथमिक माहिती नसल्याने या गुन्ह्याचा छडा लावणे, हे पोलिसांसमोर एक आव्हानच होते.

मात्र पोलिसांना गोपनीय माहिती उपयुक्त ठरली आणि अवघ्या २४ तासांत संशयितांना पकडण्यात यश आले. संशयितांपैकी एकाला त्याच्या पत्नीचे मृत पांडुरंग शिद यांच्यासमवेत अनैतिक संबंध असावेत, असा संशय होता. याच संशयावरून त्याने सहा लाख रुपयांची सुपारी देताना गुन्हा करण्यासाठी अग्निशस्त्रही पुरविले होते.

हे देखील वाचा: Kasegaon murder: कासेगाव येथे 40 वर्षीय सावकाराचा गोळ्या घालून खून: हल्लेखोर फरार ; आर्थिक कारणाचा संशय

मुख्य संशयित सुरेश ताटे हा इस्लामपूर येथील एका गॅस एजन्सीत कामाला होता. शिदचा काटा काढायचा, या हेतूने एकाकडून चार महिन्यांपूर्वी ५० हजार रुपये देऊन पिस्तूल आणि तीन गोळ्या मिळवल्या होत्या. ताटे याच्याकडे कामाला असलेल्या भोसले आणि भुसाळे या दोघांना त्याने पांडुरंग शिद यास मारण्याची सुपारी दिली होती. खून झाल्यानंतर ६ लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. त्यानुसार खून करण्यात आला.

कासेगाव

संशयित आरोपींना पाच दिवसांची कोठडी

ताटे अनेक दिवस शस्त्राच्या शोधात होता. याबाबत इस्लामपूर आणि आष्टा येथील दोघांकडून पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ताटे याला बोलते केले. त्यातून ताटे याने गुन्ह्याची कबुली दिली. ताटेसह दोघांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी तिघांनाही २२ ऑगस्टपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शस्त्र नेमके कुठून आले, कुणी पुरवले, कोणत्या ठिकाणाहून आणले गेले, याचा शोध घेतला जात आहे, असे उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

हे देखील वाचा: jat accident: जत तालुक्यातील धावडवाडी येथे क्रेन आणि दुचाकीच्या अपघातात 28 वर्षीय तरुण ठार; अपघातांची मालिका सुरूच

पोलिसांनी २४ तासांत खुनाचा छडा लावला. या तपासात निरीक्षक सतीश शिंदे, हरिश्चंद्र गावडे, नितीन सावंत, विक्रम पाटील, पंकज पवार, रुपाली बोबडे, जयनाथ चव्हाण, बाजीराव पाटील, सुरेश पाटील, आनंदा चव्हाण, अनिल पाटील, दीपक हांडे यांनी सहभाग घेतला.

‘यू ट्यूब’वरून पिस्तूल चालवण्याचे शिक्षण

गोळ्या झाडणारे दोघे अत्यंत सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांना पिस्तूल कसे वापरायचे, याबद्दल कसलेही ज्ञान नव्हते. मात्र सुरेश ताटे याने ‘यू ट्यूब’वरील व्हिडिओचा आधार घेऊन ते पिस्तूल कसे वापरायचे, हे शिकवले. गोळ्या चालवताना चुकून एक गोळी घटनास्थळी पडली होती. ती त्या दोघांपैकी एकाला लागली असती आणि त्यातील एकाला इजा होण्याची शक्यता होती, असेही पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *