जत उपकोषागार कार्यालयाचा उत्कृष्ट कामकाजाबद्दल गौरव

जत उपकोषागार कार्यालयाला उत्कृष्ट कामकाज, स्वच्छता आणि कार्यालयीन व्यवस्थापनाबद्दल जिल्हा कोषागार कार्यालय सांगलीकडून प्रशस्तीपत्र प्रदान. अधिकारी गजानन निकम यांच्यासह कर्मचाऱ्यांचे कौतुक.

आयर्विन टाइम्स वृत्तसेवा
जत : शासकीय कार्यालयांचे कामकाज सुरळीत पार पाडण्याबरोबरच कार्यालयीन अभिलेखांची योग्य देखभाल, स्वच्छता आणि नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तन या बाबींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जत येथील उपकोषागार कार्यालयाचा जिल्हा कोषागार कार्यालय, सांगली यांच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. या यशाबद्दल उपकोषागार अधिकारी गजानन निकम यांच्यासह लेखा लिपिक दीपक माळी आणि अशोक कमते यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

जत प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागील बाजूस उपकोषागार कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयामार्फत तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांची देयके पारित करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जाते. त्यामुळे कार्यालयातील दैनंदिन कामकाजाबरोबरच विविध अभिलेख अद्ययावत ठेवणे, अभिलेख कक्ष आणि स्ट्राँगरूमची योग्य देखभाल करणे, संगणकीय यंत्रणा सुस्थितीत ठेवणे अशा अनेक जबाबदाऱ्या या कार्यालयाला पार पाडाव्या लागतात.

जत उपकोषागार कार्यालयाच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल गौरव

या सर्व कामांमध्ये शिस्त आणि गुणवत्ता राखण्याबरोबरच कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांशी सौजन्याने वागणे, कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे यालाही प्राधान्य दिले जाते. कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी हंगामी महिला स्वच्छता कर्मचाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उपकोषागार अधिकारी गजानन निकम, लेखा लिपिक दीपक माळी आणि अशोक कमते हे तिघेही कार्यालयाचे कामकाज अधिक चांगल्या पद्धतीने चालावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.

हेदेखील वाचा खैराव येथे कै. विष्णू क्षिरसागर स्मृती क्रॉस कंट्री स्पर्धा; 101 खेळाडूंचा सहभाग

दरम्यान, नुकतीच सांगली जिल्हा कोषागार अधिकारी रेणुका पाटील, लेखा अधिकारी मनोज पाटील, गिरीश देशपांडे आणि सारथी शंकर हजारें यांच्या पथकाने जत उपकोषागार कार्यालयाला भेट दिली. यावेळी पथकाने कार्यालयातील विविध कामकाजाची माहिती घेतली, अभिलेख कक्ष, स्ट्राँगरूम, संगणकीय यंत्रणा तसेच कार्यालय परिसराची पाहणी केली. कार्यालयातील कामकाज आणि व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त करत पथकाने गजानन निकम, दीपक माळी आणि अशोक कमते यांच्या कामाचे विशेष कौतुक केले.

या पाहणी आणि कामकाजाच्या दखलीनंतर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत जिल्हा कोषागार कार्यालय, सांगली यांच्या वतीने जत उपकोषागार कार्यालयाला उत्कृष्ट कामकाजाबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हा कोषागार अधिकारी रेणुका पाटील यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.

या गौरवामुळे जत उपकोषागार कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून, त्यांच्या कामगिरीचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. कार्यालयीन शिस्त, स्वच्छता, अभिलेखांचे योग्य व्यवस्थापन आणि नागरिकांशी सौजन्यपूर्ण व्यवहार यांचा समन्वय साधल्यास शासकीय कार्यालयांचे कामकाज अधिक लोकाभिमुख होऊ शकते, हे जत उपकोषागार कार्यालयाच्या या गौरवातून अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *