केंद्र सरकारने पीयूसी प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत नवीन नियम निश्चित केले आहेत. बीएस-६ खासगी वाहनांसाठी सहा वर्षांपर्यंत पीयूसी प्रमाणपत्र तीन वर्षे वैध राहणार. जाणून घ्या वाहनांच्या वयानुसार नवे नियम.
नवी दिल्ली : वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या (पीयूसी) वैधतेबाबत नवीन नियम निश्चित केले आहेत. या निर्णयामुळे विशेषतः बीएस-६ श्रेणीतील खासगी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या नियमानुसार, सहा वर्षांपर्यंत जुन्या बीएस-६ खासगी वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्राची वैधता तीन वर्षे राहणार आहे. त्यामुळे वारंवार प्रदूषण तपासणी करून प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्याची कटकट कमी होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात गुरुवारी लेखी आदेश जारी केला आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ११५ च्या उपनियम (७) मध्ये सुधारणा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. वाहनांच्या उत्सर्जन मानकांनुसार आणि वयानुसार पीयूसी प्रमाणपत्राची वैधता निश्चित करण्यात आली आहे.
नव्या सुधारणांनुसार, बीएस-१, बीएस-२ आणि बीएस-३ श्रेणीतील वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र तीन महिन्यांसाठी वैध असेल. बीएस-४ वाहनांसाठी ही मुदत सहा महिने निश्चित करण्यात आली आहे. तर बीएस-६ खासगी वाहनांच्या वयानुसार प्रमाणपत्राची वैधता तीन वर्षे, एक वर्ष आणि सहा महिने अशी असेल.
बीएस-६ खासगी वाहनांच्या पहिल्या नोंदणीपासून सहा वर्षांपर्यंत पीयूसी प्रमाणपत्र तीन वर्षांसाठी वैध राहील. सहा ते दहा वर्षे जुन्या वाहनांसाठी एक वर्ष, तर दहा वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांसाठी सहा महिन्यांची वैधता असेल.
बीएस-६ वाहतूक वाहनांसाठीही स्वतंत्र नियम करण्यात आले आहेत. पहिल्या नोंदणीपासून सहा वर्षांपर्यंतच्या वाहनांना दोन वर्षांसाठी पीयूसी प्रमाणपत्र मिळेल. सहा ते दहा वर्षे जुन्या वाहनांसाठी एक वर्ष, तर दहा वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांसाठी सहा महिन्यांची वैधता असेल.
हेदेखील वाचा : बेळगावमध्ये आईनेच रचला आपल्या 24 वर्षीय मुलाच्या खुनाचा कट; प्रियकरासह सहा जणांना अटक
वाहनांच्या वयानुसार तपासणीची व्यवस्था
नवीन नियमांचा उद्देश कमी प्रदूषण करणाऱ्या आधुनिक वाहनांच्या मालकांवरील नियमपालनाचा अनावश्यक भार कमी करणे, तसेच जुन्या वाहनांच्या प्रदूषण तपासणीकडे अधिक लक्ष देणे हा आहे. बीएस-१, बीएस-२ आणि बीएस-३ वाहनांमध्ये आधुनिक उत्सर्जन नियंत्रण यंत्रणा नसल्याने त्यांची तीन महिन्यांनी तपासणी आवश्यक मानण्यात आली आहे. तर बीएस-४ आणि बीएस-६ वाहनांमध्ये तुलनेने प्रगत उत्सर्जन नियंत्रण यंत्रणा उपलब्ध असल्याने त्यांच्या वयानुसार तपासणीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
जुन्या प्रमाणपत्रांना तात्काळ नवा नियम लागू नाही
दरम्यान, नवीन सुधारणा लागू होण्यापूर्वी जारी करण्यात आलेल्या पीयूसी प्रमाणपत्रांची वैधता आपोआप वाढणार नाही. संबंधित प्रमाणपत्राचे नवीन नियम लागू झाल्यानंतर प्रथमच नूतनीकरण केले जाईल, त्या तारखेपासून सुधारित वैधता कालावधी लागू होणार आहे.
परिवहन क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल चिकारा यांच्या मते, वाहनांचे वय वाढत जाईल तसतशी त्यांच्या देखभालीकडे अधिक काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. केवळ पीयूसी तपासणीचा कालावधी निश्चित करून प्रदूषण नियंत्रण साध्य होणार नाही, तर वाहनांची नियमित देखभाल आणि उत्सर्जन नियंत्रणासाठी सातत्याने प्रयत्न करणेही महत्त्वाचे आहे.
एकूणच, नव्या नियमांमुळे नवीन आणि कमी प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना वारंवार पी यू सी काढण्यापासून दिलासा मिळणार असून, जुन्या वाहनांच्या प्रदूषण तपासणीवर अधिक भर दिला जाणार आहे.
नव्या नियमानुसार पीयूसी प्रमाणपत्राची वैधता
| वाहनांचा प्रकार | प्रमाणपत्राची वैधता |
|---|---|
| बीएस-१, बीएस-२ आणि बीएस-३ | ३ महिने |
| बीएस-४ वाहने | ६ महिने |
| बीएस-६ खासगी वाहने (६ वर्षांपर्यंत) | ३ वर्षे |
| बीएस-६ खासगी वाहने (६ ते १० वर्षे) | १ वर्ष |
| बीएस-६ खासगी वाहने (१० वर्षांपेक्षा अधिक) | ६ महिने |
| बीएस-६ वाहतूक वाहने (६ वर्षांपर्यंत) | २ वर्षे |
| बीएस-६ वाहतूक वाहने (६ ते १० वर्षे) | १ वर्ष |
| बीएस-६ वाहतूक वाहने (१० वर्षांपेक्षा अधिक) | ६ महिने |
