कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी अजित पवार राष्ट्रवादीचे राजेश पाटील यांची निवड. शासन नियुक्त चार संचालकांच्या मतदानामुळे महायुतीने मिळवले अध्यक्षपद.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत अखेर महायुतीने बाजी मारली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील यांचा १६ विरुद्ध १३ मतांनी पराभव केला. शासन नियुक्त चार संचालकांच्या मतदानामुळे गोकुळमधील सत्तेचे समीकरण बदलले आणि बहुमत असूनही समविचारी आघाडीला अध्यक्षपद मिळवता आले नाही. या निकालानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गोकुळच्या मुख्यालयाबाहेर जल्लोष केला.

गोकुळच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या होत्या. तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत समविचारी आघाडीचे पारडे जड मानले जात होते. मात्र, अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत गणपूर्ती आणि शासन नियुक्त संचालकांच्या मतदानामुळे संपूर्ण राजकीय गणित बदलले.

गणपूर्तीअभावी पहिली सभा तहकूब

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची पहिली बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, महायुतीच्या १२ संचालकांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे केवळ १३ संचालक उपस्थित राहिले. अध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक असल्याने गणपूर्ती होऊ शकली नाही. परिणामी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी सभा तहकूब केली होती.

यानंतर समविचारी आघाडीने स्वतंत्र बैठक घेऊन शशिकांत पाटील चुनेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले होते. मात्र, या निवडीला शासकीय मान्यता मिळाली नव्हती. या प्रकरणी समविचारी आघाडीने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाची बैठक घेण्याचे आदेश दिले होते.

चार शासकीय संचालकांचे मतदान निर्णायक

न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी गोकुळच्या मुख्यालयात अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. सुरुवातीला निवडून आलेल्या २५ संचालकांचे मतदान घेण्यात आले. त्यात समविचारी आघाडीचे शशिकांत पाटील यांना १३, तर महायुतीचे राजेश पाटील यांना १२ मते मिळाली. त्यानंतर शासन नियुक्त चार संचालकांचे स्वतंत्र मतदान घेण्यात आले. या मतदानाच्या आधारे राजेश पाटील यांना एकूण १६ मते मिळाली आणि त्यांनी अध्यक्षपदावर विजय मिळवला.

या निवडीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गोकुळच्या परिसरात मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याने त्यांना मुख्यालयापासून काही अंतरावर थांबवण्यात आले होते.

हेदेखील वाचा: हुलजंतीत गुरु-शिष्य पालखी भेट सोहळा; 3 लाख भाविकांची उपस्थिती

चंद्रकांत पाटील-सतेज पाटील यांच्यात शाब्दिक संघर्ष

गोकुळच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्षही उफाळून आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यास सतेज पाटील यांचे साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसेच सतेज पाटील यांनी आपली मालमत्ता जाहीर करावी आणि ती कशी मिळवली, हे सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सतेज पाटील यांनी हिंमत असेल तर समोरासमोर निवडणूक लढवण्याचे खुले आव्हान दिले. सरकारी पदाचा आणि सत्तेचा वापर करून धमक्या देऊ नयेत. अशा धमक्यांना आपण घाबरणार नसल्याचे सांगत २०२९ मध्ये कार्यकर्त्यांच्या बळावर लढा देण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीची कागदपत्रे कोषागारात सुरक्षित

अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतपत्रिका, नामनिर्देशनपत्रे आणि इतर संबंधित कागदपत्रे सिलबंद पेटीत ठेवण्यात आली आहेत. ही पेटी जिल्हा कोषागार कार्यालय, कोल्हापूर यांच्या सुरक्षेत ठेवण्यात आल्याची माहिती अध्यासी अधिकारी तथा करवीर उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी दिली.

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीने कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या समविचारी आघाडीला अध्यक्षपदापासून दूर राहावे लागले, तर शासन नियुक्त संचालकांच्या मतदानाच्या जोरावर महायुतीने गोकुळच्या नेतृत्वाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *