बेंगळुरूमध्ये 7 जणांची हत्या

बेंगळुरूमध्ये कॅब चालकाने पत्नीच्या माहेरच्या सात सदस्यांची हत्या केल्याचा आरोप. हत्याकांडात अल्पवयीन मुलीच्या सहभागाचा संशय असून पोलिसांकडून चौकशी सुरू.

बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे सात जणांच्या हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली आहे. एका कॅब चालकाने आपल्या पत्नीच्या माहेरच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्याचा दावा केला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या अल्पवयीन मुलीने हत्येनंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. या संशयाच्या आधारे तपास अधिकारी तिची चौकशी करत असून, हत्याकांडातील तिची नेमकी भूमिका स्पष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलिसांनी मृतांची ओळख आरोपीची पत्नी सुनीता, सासू रूपवती, मेहुणे शिवकुमार व शंकर, मेहुण्या दिव्या व नलिनी आणि शंकरचा सात वर्षांचा मुलगा पुनीत अशी पटवली आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपी इंदुशेखर याने अवघ्या दोन दिवसांत या सातही जणांची हत्या केल्याचा संशय आहे.

पत्नीची हत्या करून हत्याकांडाला सुरुवात

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सर्वप्रथम पत्नी सुनीताची घरात पाटा-वरवंट्याने हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह कपड्यात गुंडाळून नंदी हिल्स परिसरात फेकून दिला. सुनीताचा मोबाईल फोन बंद करून ती फिरायला गेल्याचे त्याने शेजाऱ्यांना सांगितले. त्यामुळे सुरुवातीला तिच्या बेपत्ता होण्याबाबत कोणालाही संशय आला नाही.

यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने मेहुणे शिवकुमार आणि शंकर यांना पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावले. त्यांचीही वरवंट्याने हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दिव्या, नलिनी, सासू रूपवती आणि सात वर्षांचा पुनीत यांचीही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

बेंगळुरूमध्ये 7 जणांची हत्या

रक्ताचे डाग पुसण्यासाठी रसायनांचा वापर

हत्येनंतर घरातील रक्ताचे डाग पुसण्यासाठी आरोपीने रासायनिक पदार्थांचा वापर केल्याचा पोलिसांना संशय आहे. मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी वापरल्याचा संशय असलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच हत्येसाठी वापरलेला पाटा-वरवंटाही हस्तगत करण्यात आला आहे.

नंदी हिल्सच्या पायथ्याशी पोलिसांनी सुमारे चार तास शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेत सात वर्षांच्या पुनीतचा मृतदेह आढळला. मात्र, इतर मृतदेहांचा शोध आणि आरोपीने केलेल्या दाव्यांची पडताळणी सुरू आहे.

हेदेखील वाचा : मानसशास्त्रीय चित्रपटांचा बदलता चेहरा; अंधश्रद्धेकडून वास्तवाकडे प्रवास

कौटुंबिक वादातून हत्याकांड?

इंदुशेखर आणि सुनीता यांचे सुमारे २० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. सुनीता वारंवार माहेरी जात असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सुनीताला तिच्या आई आणि भावांचा पाठिंबा मिळत असल्याने आरोपी नाराज होता, असेही सांगण्यात येत आहे.

कुटुंबीयांनी अनेकदा दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्यातील मतभेद कायम राहिले. पत्नीच्या माहेरच्या लोकांशी असलेल्या संबंधांवरून निर्माण झालेल्या कौटुंबिक वादातून आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बेंगळुरूमध्ये सात जणांची हत्या

बेपत्ता तक्रारीमुळे हत्याकांड उघडकीस

नलिनीच्या आईने गुरुवारी श्रीरामपुरा पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या तपासादरम्यान पोलिसांना हत्याकांडाची माहिती मिळाली. त्यानंतर संशयित इंदुशेखरला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आणि पुढे त्याला अटक करण्यात आली.

आरोपीने पत्नीच्या कुटुंबातील सातही सदस्यांची हत्या केल्याचा दावा केला असला, तरी पोलिसांकडून त्याची पडताळणी सुरू आहे. हत्याकांडात अन्य कोणी सहभागी होते का, मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणाची मदत घेण्यात आली होती का, याचाही तपास केला जात आहे.

विशेष म्हणजे, आरोपीच्या अल्पवयीन मुलीवरही पोलिसांचा संशय असून तिची चौकशी सुरू आहे. हत्यांबाबत तिला कितपत माहिती होती आणि मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात तिचा सहभाग होता का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे. या चौकशीतून हत्याकांडातील अनेक महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *