79 वा निरंकारी संत समागम

संत निरंकारी मिशनचा ७९वा वार्षिक संत समागम २३ ते २६ ऑक्टोबर २०२६ दरम्यान समालखा येथे होणार. ‘जागृती’ विषयातून सेवा, समर्पण, प्रेम आणि मानव एकतेचा संदेश दिला जाणार.

‘जागृती’च्या संदेशातून मानवता, एकत्व आणि सद्भावनेचा जागर

दिल्ली : संत निरंकारी मिशनचा ७९वा वार्षिक संत समागम २३ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत समालखा येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळावर भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन सान्निध्यात होणारा हा समागम प्रेम, सेवा, समर्पण, सद्भावना आणि मानव एकतेचा संदेश देणारा आध्यात्मिक सोहळा ठरणार आहे.

79 वा निरंकारी संत समागम

यंदाच्या संत समागमाचा प्रेरणादायी विषय ‘जागृती’ असा आहे. अंतर्मनात ज्ञानाचा प्रकाश जागृत झाला की जीवनाची दिशाच बदलते. सेवेतून समर्पण, सुमिरणातून शांती आणि सत्संगातून सत्याची अनुभूती मिळते. हीच आत्मिक जागृती मानवाला प्रेम, प्रभुभक्ती आणि मानवतेच्या मार्गावर घेऊन जाते. त्यामुळे यंदाचा संत समागम श्रद्धाळूंसाठी केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता आत्मचिंतन आणि अंतर्मुख करणारी आध्यात्मिक अनुभूती ठरणार आहे.

संत समागमाची शुभवार्ता मिळताच देशभरातील श्रद्धाळू भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. समागमाच्या तयारीसाठी विविध ठिकाणांहून आलेले सेवेकरी तन-मनाने सेवाकार्यात सहभागी झाले आहेत. वय, सामाजिक स्तर आणि पार्श्वभूमीच्या सीमा ओलांडून हजारो सेवेकरी निःस्वार्थ भावनेने विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.

हेदेखील वाचा: marathi viral news: प्लेट समजून भाकरी धुतली! परदेशी पर्यटकाचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पहाटेच्या पहिल्या किरणापासून ते सायंकाळपर्यंत समागम परिसरात सेवा, भक्ती आणि समर्पणाचे चित्र पाहायला मिळत आहे. कोणी बांधकामाच्या कामात योगदान देत आहे, तर कोणी शामियाने उभारणे, सजावट, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि भोजन व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहे. समागमाच्या भव्यतेची साक्ष देणारे मुख्य प्रवेशद्वारही आकार घेत असून, प्रेम, समरसता आणि आत्मिक एकत्वाच्या दिशेने टाकलेल्या पावलांचे ते प्रतीक ठरणार आहे.

79 वा निरंकारी संत समागम

सेवेकऱ्यांच्या चेहऱ्यावर कामाचा थकवा दिसत नाही; उलट समाधान, आनंद आणि समर्पणाची झळाळी जाणवते. कारण त्यांच्यासाठी सेवा हे केवळ कर्तव्य नसून सद्गुरूविषयीचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम आहे. निःस्वार्थ भावनेने केलेली सेवा जीवनात आनंद आणि आत्मिक समाधान निर्माण करते, अशी त्यांची भावना आहे.

सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आपल्या प्रवचनांमधून सेवा, सत्संग आणि प्रभुस्मरणाचे महत्त्व सातत्याने अधोरेखित करतात. त्या म्हणतात—

‘तन पवित्र सेवा किये, धन पवित्र दिये दान,
मन पवित्र हरि भजन सों, त्रिबिध होई कल्याण।’

अर्थात, शरीर सेवेसाठी, धन परोपकारासाठी आणि मन प्रभुभक्तीसाठी समर्पित झाले, तर जीवनात खऱ्या कल्याणाचा आणि आत्मिक शांतीचा मार्ग प्रशस्त होतो.

समागमात सहभागी होणाऱ्या श्रद्धाळूंच्या सुविधांसाठी निवास, भोजन, पाणी, स्वच्छता, वाहतूक आणि इतर आवश्यक व्यवस्थांची तयारीही नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. सेवा, सत्कार आणि आपुलकीच्या भावनेतून प्रत्येक भाविकाला सन्मानपूर्ण आणि आत्मीय वातावरण मिळावे, यासाठी सेवेकरी कार्यरत आहेत.

79 वा निरंकारी संत समागम

विविध भाषा, संस्कृती आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेले श्रद्धाळू एकत्र येऊन ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेचा प्रत्यय देतात, हीच या संत समागमाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. सद्गुरूंच्या अमृतवाणीच्या माध्यमातून प्रेम, शांती, मानवता आणि एकत्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या समागमातून केला जाणार आहे.

निष्काम सेवेचा सुगंध, समर्पणाचे तेज आणि मानवतेच्या एकत्वाचा संदेश घेऊन होणारा हा ७९वा वार्षिक निरंकारी संत समागम श्रद्धाळूंसाठी आध्यात्मिक जागृतीचा आणि आत्मिक आनंदाचा अनुपम सोहळा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *