नेलकरंजीतील जकाई देवीचे चांदीचे दागिने चोरी

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात नेलकरंजी येथे जकाई देवीचे चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. सात जणांना अटक करून ४ किलो २४३ ग्रॅम चांदीचे दागिने आणि दोन दुचाकी जप्त.

सांगली : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे जकाई देवीचे चांदीचे दागिने ठेवलेल्या बंद घरात घरफोडी करून दागिने चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ किलो २४३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एकूण ९ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २९ ऑक्टोबर रोजी सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील झुलेलाल मंदिर परिसरात करण्यात आली.

नेलकरंजी येथील रुक्मिणी बाळासाहेब भोसले यांच्या बंद घरात १९ जून ते २२ जून २०२६ या कालावधीत घरफोडी झाली होती. भोसले या दवाखान्याच्या कामासाठी बाहेरगावी गेल्या असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान करून बेडरूममधील कपाटातील सोन्याचे व जकाई देवीचे चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्वतंत्र पथक तयार केले. पोलीस निरीक्षक संजीप झाडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने तपास सुरू केला.

२९ ऑक्टोबर रोजी पोलीस हवालदार संदीप नलावडे यांना गोपनीय माहिती मिळाली की, नेलकरंजी येथील चोरीचे जकाई देवीचे चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी काही जण दोन दुचाकींवरून सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील युडलॅंड हॉटेलच्या पाठीमागील झुलेलाल मंदिराकडे येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. यावेळी तीन दुचाकींजवळ थांबलेल्या सात संशयितांना पथकाने ताब्यात घेतले.

नेलकरंजीतील जकाई देवीचे चांदीचे दागिने चोरी

संशयितांची झडती घेतली असता, बादशहा यमनालाख याच्याकडील मोटारसायकलला असलेल्या विमल पानमसाल्याच्या पिशवीत चांदीचे दागिने आढळले. चौकशीत हे दागिने नेलकरंजी येथील बंद घरातून चोरी केल्याचे समोर आले. या चोरीत अटक केलेल्या सात जणांसह इचलकरंजी येथील तबरेज खान, सद्दाम पठाण आणि उमाजी गुजले यांचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेदेखील वाचा : पत्नीच्या खुनप्रकरणी पतीला जन्मठेप; सांगली सत्र न्यायालयाचा निकाल

या कारवाईत पोलिसांनी छत्र, समई, घोडा, पाळणे, घंट्या, किरीट, करंडा, आरतीची पात्रे, पैंजण, तांब्या, तलवार, गणपतीची मूर्ती आणि चांदीची नाणी अशा वस्तूंसह ४ किलो २४३ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. तसेच हिरो सीडी डिलक्स मोटारसायकल आणि टीव्हीएस ज्युपिटर मोपेड या दोन दुचाकीही जप्त केल्या आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ९ लाख ३९ हजार ४०० रुपये असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी आरबाज जैनुल मिराखान, बादशहा अल्लाबख्श यमनालाख, सोहेल मोहम्मद रफिक दस्तगीर, प्रमोद रावसो खल्लासे, शशिकांत अशोक दबडे, विनायक सुनील पाटील आणि विनोद रावसाहेब यादव या सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील जप्त मुद्देमालासह आरोपींना पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीप झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास आटपाडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *