हरियाणातील नारनौल येथील चोर गुंबद ही चौदाव्या शतकातील ऐतिहासिक वास्तू आहे. एकसारखे २० दरवाजे, दिशाभूल करणारी रचना आणि रंजक इतिहास जाणून घ्या.
लखनऊच्या प्रसिद्ध भूलभुलैय्याबद्दल अनेकांनी ऐकले असेल; मात्र, त्यापेक्षाही सुमारे चारशे वर्षे जुनी असलेली हरियाणातील ‘चोर गुंबद’ ही ऐतिहासिक वास्तू आजही अनेकांसाठी अनोळखी आहे. एकसारखे दिसणारे २० दरवाजे, भिंतींमधून जाणाऱ्या अरुंद वाटा आणि दिशाभूल करणारी रचना यांमुळे ही वास्तू स्थापत्यकलेतील एक अनोखे कोडे ठरली आहे. इतिहासाच्या पानांत दडलेली ही वास्तू केवळ मकबरा नसून, तिच्या नावामागेही एक रंजक कहाणी आहे.
काय आहे चोर गुंबदचा इतिहास?
अवधमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळानंतर नवाब आसफुद्दौला यांनी इ.स. १७९४ मध्ये लखनऊ येथे प्रसिद्ध भूलभुलैय्याची उभारणी केली. मात्र, त्याच्या कितीतरी आधी हरियाणातील नारनौल येथे दिशाभूल करणाऱ्या रचनेची एक वास्तू उभी राहिली होती.
दिल्ली सल्तनतीचा सुलतान फिरोजशाह तुघलक याच्या कारकिर्दीत (इ.स. १३५१ ते १३८८) अफगाण सरदार आणि व्यापारी जमाल खान यांनी महेंद्रगड जिल्ह्यातील नारनौल येथील एका निर्जन टेकडीवर स्वतःच्या मकबऱ्याच्या रूपात या वास्तूची उभारणी केली. कालांतराने ही वास्तू ओसाड पडली आणि तिच्याभोवती अनेक रंजक कहाण्या निर्माण झाल्या.
चोरांसाठी आश्रयस्थान, पाठलाग करणाऱ्यांसाठी भूलभुलैया!
दीर्घकाळ निर्जन राहिल्यामुळे चोर गुंबद पुढे दरोडेखोर, ठग आणि चोरांसाठी लपण्याचे ठिकाण बनली. गुन्हेगारांचा पाठलाग करत येथे येणारे लोकही वास्तूच्या गुंतागुंतीच्या रचनेत अडकून पडत असत. एकसारखे दिसणारे दरवाजे आणि भिंतींमधून जाणाऱ्या अरुंद वाटांचा फायदा घेत गुन्हेगार सहजपणे दुसऱ्या मार्गाने पसार होत असत.
या वैशिष्ट्यामुळेच लोककथांमध्ये या वास्तूला ‘चोर गुंबद’ असे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी उपरोधिकपणे तिला ‘साहूकार गुंबद’ असेही संबोधले जाते.
वीस दरवाजे, पण दिशेचा अंदाज लावणे कठीण!
चोर गुंबदचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची दिशाभूल करणारी अंतर्गत रचना. इतिहासकार प्रा. आर. नाथ यांनी आपल्या ‘हिस्ट्री ऑफ मुघल आर्किटेक्चर’ या पुस्तकात या वास्तूचा उल्लेख तुघलककालीन आणि प्रारंभीच्या प्रादेशिक अफगाण स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून केला आहे.
ही वास्तू प्रत्यक्षात एकमजली असली, तरी बाहेरून पाहताना ती दुमजली असल्याचा भास होतो. तिच्या चारही भिंतींमध्ये प्रत्येकी पाच कमानदार मार्ग आहेत. अशा प्रकारे एकूण २० दरवाजे तयार झाले आहेत. या सर्व दरवाजांचा आकार, उंची आणि स्वरूप जवळजवळ एकसारखे असल्यामुळे कोणत्या मार्गाने आत आलो आणि बाहेर जाण्याचा मार्ग कोणता, याचा अंदाज लावणे कठीण होते.
या मार्गांमधील वळणे आणि एकसारख्या कमानी यांमुळे वास्तूच्या आत फिरताना दिशाभ्रम होतो. म्हणूनच स्थानिक लोक या रचनेला ‘भूलभुलैया’ असे म्हणतात.
हेदेखील वाचा : थाई मांगूर माशावर भारतात बंदी का? धोकादायक मासळी असूनही दुप्पट नफ्याचे आमिष
अरवलीच्या दगडांतून साकारलेली स्थापत्यकला
कुरुक्षेत्र विद्यापीठाचे माजी प्राध्यापक के. सी. यादव यांनी ‘हरियाणा : इतिहास एवं संस्कृती’ या पुस्तकात चोर गुंबदविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या मते, अरवली पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या फिकट तपकिरी किंवा करड्या रंगाच्या दगडांचा वापर करून स्थानिक कारागिरांनी ही वास्तू उभारली.
या वास्तूच्या बाह्य भिंती तळाशी रुंद असून, वरच्या दिशेने जाताना त्या किंचित आत झुकलेल्या दिसतात. ही वैशिष्ट्यपूर्ण रचना मध्ययुगीन स्थापत्यकलेतील बांधकाम तंत्राची साक्ष देते. या रचनेमुळे भूकंपाच्या धक्क्यांचा परिणाम कमी होण्यास मदत होत असावी, असे मानले जाते.
महेंद्रगड जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्येही बांधकामाच्या वैशिष्ट्यांचा विचार करून चोर गुंबदचा काळ जवळच असलेल्या इ.स. १३५७ मध्ये बांधलेल्या मदरशाच्या जुन्या भागांच्या समकालीन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वैभव आणि सामर्थ्याचे प्रतीक
प्रा. आर. नाथ यांच्या मते, फिरोजशाह तुघलकाच्या काळात भव्य वास्तूंची निर्मिती हे आपली निष्ठा, प्रतिष्ठा आणि सामाजिक प्रभाव प्रदर्शित करण्याचे महत्त्वाचे साधन होते. त्या काळातील सरदार आणि प्रभावशाली व्यक्ती आपल्या आर्थिक सामर्थ्याची तसेच सामाजिक स्थानाची जाणीव करून देण्यासाठी अशा वास्तू उभारत असत.
जमाल खान यांनीही चोर गुंबदची उभारणी करून आपले वैभव आणि सामर्थ्य प्रदर्शित केले होते. आज या वास्तूकडे केवळ चोरांचे आश्रयस्थान किंवा भूलभुलैया म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. तिची रचना, बांधकामासाठी वापरलेले दगड आणि स्थापत्यशैली यांमधून चौदाव्या शतकातील वास्तुनिर्मितीची परंपरा समजून घेता येते.
इतिहास, स्थापत्यकला आणि लोककथांचा अनोखा संगम असलेली चोर गुंबद ही हरियाणाच्या ऐतिहासिक वारशातील एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आहे. एकसारखे दिसणारे वीस दरवाजे आणि दिशाभूल करणाऱ्या वाटा यांमुळे तिला मिळालेले वेगळेपण आजही इतिहासप्रेमी आणि स्थापत्यकलेच्या अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय ठरते.
