भोकर येथील SBI बँकेवर सशस्त्र दरोडा टाकून २७ किलो सोने आणि १२ लाखांची रोकड लुटणाऱ्या चार आरोपींना जळगाव पोलिसांनी काही तासांत अटक केली. ३६.४८ कोटींचा मुद्देमाल जप्त.
जळगाव : भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेवर सशस्त्र दरोडा टाकून तब्बल ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या चार सराईत दरोडेखोरांना जळगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या. पोलिसांची सतर्कता आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे दरोड्याचा हा थरारक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेले सुमारे २७ किलो सोने, १२ लाख २६ हजार ५०० रुपयांची रोकड, दोन दुचाकी आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत.
बँक कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.४५ ते ३.१५ वाजण्याच्या सुमारास हेल्मेट आणि मास्क घातलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी भोकर येथील एसबीआय शाखेत प्रवेश केला. त्यांच्याकडे बंदूक, धारदार चाकू आणि लाकडी दांडका होता. या हत्यारांचा धाक दाखवत त्यांनी शाखा व्यवस्थापक जयेश राणे, कॅशियर रणजित मराठे यांच्यासह बँकेतील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली.
दरम्यान, सुरक्षा रक्षक संदीप कोळी यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी शंकर जासक याने त्यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. त्यानंतर आरोपींनी बँकेच्या स्ट्राँग रूममधील लॉकरमध्ये ठेवलेली १२ लाख २६ हजार ५०० रुपयांची रोकड आणि सुमारे २७ किलो वजनाचे तारण ठेवलेले सोन्याचे दागिने लुटले. सोन्याचे दागिने ८७१ बॅगमध्ये ठेवण्यात आले होते. एकूण ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन आरोपींनी पळ काढला.
नाकाबंदीत पोलिसांनी आवळला फास
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. दुपारी ३.१७ वाजता घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर धरणगाव, चोपडा, यावल आणि अडावद या मार्गांवर पाळत ठेवण्यात आली. पोलीस नियंत्रण कक्षाला सतर्क करून डिकसाई येथे नाकाबंदी करण्यात आली.
या नाकाबंदीदरम्यान संशयित वाहनांची तपासणी करताना अंकुश तुळशीराम पवार (चव्हाण) आणि अंकुश श्रावण चव्हाण यांना लुटलेल्या मुद्देमालाच्या बॅगेसह पकडण्यात आले. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशीकांत पाटील, नांद्रा बीटचे पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक सागर कोळी आणि भगवान कोळी यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
पकडलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता अन्य दोघे धरणगावच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार धरणगाव पोलिसांना तातडीने सतर्क करण्यात आले. पोलीस निरीक्षक रमाकांत गायकवाड यांच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने नाकाबंदी करून गजानन राजेंद्र पवार आणि शंकर रमेश जासक यांना उर्वरित मुद्देमालासह ताब्यात घेतले.
हेदेखील वाचा : आप्पाचीवाडी भाकणूक 2026 : देशात पाणीटंचाई, दुष्काळ आणि तिसऱ्या महायुद्धाचे संकट?
आरोपी सराईत गुन्हेगार
अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये अंकुश तुळशीराम पवार (वय २५, रा. खापरखेडा, जि. बुरहानपूर, मध्य प्रदेश), गजानन राजेंद्र पवार (वय ३२, रा. न्यायडोंगरी, जि. नाशिक), शंकर रमेश जासक (वय ४२, रा. जळगाव) आणि अंकुश श्रावण चव्हाण (वय ३०, रा. रामदेववाडी, जळगाव) यांचा समावेश आहे.
यातील काही आरोपींवर यापूर्वी दरोडा, खून, शस्त्र बाळगणे आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अंकुश पवार याच्यावर मुक्ताईनगर आणि जामनेर पोलीस ठाण्यांत दरोडा व शस्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. गजानन पवार याच्यावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. तर शंकर जासक याच्यावर शनीपेठ पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
सोने, रोकड आणि दोन दुचाकी जप्त
पोलिसांनी या कारवाईत १२ लाख २६ हजार ५०० रुपयांची रोकड, सुमारे २७ किलो सोन्याचे दागिने (८७१ बॅग) असा एकूण ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याशिवाय पल्सर २२० (क्रमांक TS 13 ER 5554) आणि होंडा साइन (क्रमांक MH 41 BY 6121) या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहीम
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका आणि धरणगाव पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. या मोहिमेत स्थानिक पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. नागरिकांच्या तत्पर प्रतिसादामुळे आणि पोलिसांच्या जलद हालचालींमुळे कोट्यवधी रुपयांच्या दरोड्याचा डाव काही तासांत उधळण्यात यश आले.
