सांगलीतील ५२ व्या कोल्हापूर परिघक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत जयश्री तानाजी गडदे यांनी कुस्ती आणि बॉक्सिंगमध्ये दोन सुवर्णपदके पटकावली. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली.
सांगली : पोलिस दलातील कर्तव्य, कौटुंबिक जबाबदारी आणि दोन मुलांचे संगोपन सांभाळत महिला पोलिस अंमलदार जयश्री तानाजी गडदे यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सांगली येथे झालेल्या ५२ व्या कोल्हापूर परिघक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत त्यांनी कुस्ती आणि बॉक्सिंग या दोन्ही क्रीडा प्रकारांत सुवर्णपदके पटकावून दुहेरी सुवर्णभरारी घेतली. त्यांच्या या कामगिरीमुळे पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
सांगली पोलिस क्रीडांगणावर पार पडलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यांतील ९०० हून अधिक पोलिस खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जयश्री गडदे यांनी कुस्तीच्या ७० किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर बॉक्सिंगच्या ६४ किलो वजनी गटातही दमदार कामगिरी करत दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
जयश्री गडदे यांची यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी राहिली आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धांपर्यंत त्यांनी मजल मारली आहे. पोलिस दलातील सेवा, घरची जबाबदारी आणि दोन मुलांचे संगोपन या सर्व आघाड्या सांभाळत त्यांनी क्रीडा क्षेत्रातील सराव आणि जिद्द कायम ठेवली आहे.
त्यांच्या यशाला कौटुंबिक पातळीवरही विशेष महत्त्व आहे. जयश्री यांचे पती राहुल रमेश घागरे हे भारतीय सैन्यदलात जवान म्हणून कार्यरत असून, सध्या जम्मू-काश्मीर येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत आहेत. एकीकडे पती देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात असताना दुसरीकडे जयश्री पोलिस दलातील जबाबदारी पार पाडत क्रीडा क्षेत्रात देशाचा आणि पोलिस दलाचा नावलौकिक वाढवत आहेत.
मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवलेल्या या दुहेरी सुवर्णयशामुळे जयश्री गडदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आगामी राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
