जत (jat) तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले
जत, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा):
जत (jat) तालुक्यात बुधवारी दिनांक ३० रोजी झालेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये तब्बल ८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. विशेष म्हणजे या चोरीच्या घटनांमध्ये एका भाजप आमदाराच्या सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचे दागिने लंपास झाल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. दरम्यान अलीकडच्या काही दिवसांत जत (jat) तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढले आहे.
पहिल्या घटनेत, करेवाडी (को.बो.) येथील रहिवासी जयश्री बलराम गोफणे, या भाजप आमदार राम कदम यांचे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत. जयश्री या आपल्या मुलीसह कानपोली ( ता. पनवेल) येथून मूळ गावी करेवाडीला एसटीने प्रवास करत असताना, जत बसस्थानकावर त्यांच्या बॅगेतील साहित्य चोरीला गेले. या बॅगेत ४ लाख ७२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते, ज्यात गंठण, चेन, नेकलेस, अंगठ्या, कानातील झुमके व टॉप यांचा समावेश होता. जयश्री यांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
दुसऱ्या घटनेत, जत (jat) शहरातील सूरज राजेंद्र कारंडे यांच्या घरात चोरी झाली. ते शंकर कॉलनी येथे राहतात व दिवाळी साजरी करण्यासाठी मळ्यात गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. तिजोरी फोडून सुमारे ३ लाख ३० हजार रुपयांचे दागिने आणि ३० हजारांची रोकड लंपास करण्यात आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोन्ही घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची मोहिम सुरु केली आहे.
हे देखील वाचा: Good news: सांगली सायबर पोलिसांची दिवाळी भेट: नागरीकांचे 7.50 लाखांचे 60 मोबाईल परत