पती सुशांत अद्याप फरार
सांगली / आयर्विन टाइम्स
चारित्र्याच्या संशयातून आणि कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सांगलीतील जुना बुधगाव रस्ता परिसरात घडली आहे. या हिंसाचारात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पतीविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पती सुशांत अद्याप फरार आहे.
घटना शनिवारी, १२ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ईदगाह मैदानाजवळील कोरे बिल्डिंग परिसरात घडली. या घटनेत शांती उर्फ कोमल सुशांत तुपसौदर्य (वय २४, रा. संजयनगर पोलीस ठाण्याच्या मागे, म्हाडा कॉलनी, सांगली) ही गंभीर जखमी झाली आहे. हल्लेखोर पती सुशांत शहाजी तुपसौदर्य (वय २८, रा. म्हाडा कॉलनी, संजयनगर, सांगली) याने चारित्र्याच्या संशयातून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला.
हल्ल्याची पार्श्वभूमी आणि घटना
शांती आणि सुशांत यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते, मात्र काही दिवसांपासून शांती तिच्या सासरहून माहेरी, आव्वाक्का मुरगेश कोबाल (रा. कोरे बिल्डिंग, सांगली) यांच्या घरी राहायला आली होती. सुशांतला शांतीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने ती माहेरी का राहते याबाबत विचारणा करण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी आव्वाक्का यांच्या घरी अचानक धडक दिली.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुशांतने शांतीला जाब विचारला, त्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्यावर सुशांतने आपल्या बरोबर आणलेल्या चाकूने शांतीच्या पोटात वार केले. तसेच तिच्या खांद्यावर, पाठीवर आणि गुडघ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले. हल्ला केल्यानंतर सुशांत घटनास्थळावरून फरार झाला.
घटनास्थळावरील माहिती आणि पुढील तपास
घटनेची माहिती मिळताच शांतीच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात तिच्यावर अत्यावस्थेत उपचार सुरू आहेत. दरम्यान, आव्वाक्का मुरगेश कोबाल यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी सुशांत तुपसौंदर्यविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सांगली शहर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. सुशांत अद्याप फरार असल्याने त्याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.