‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई‘ चित्रपट ३ जानेवारी २०२५ रोजी होणार प्रदर्शित
आयर्विन टाइम्स / मुंबई
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई‘ या मराठी चित्रपटाचे नवीन पोस्टर रक्षाबंधनाच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टर माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई या भावाबहिणीच्या नात्यातील प्रेमाच्या बंधाला उजाळा देते. हा मराठी चित्रपट पुढील वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे.
रक्षाबंधन हा भावाबहिणीतील नात्याचा बंध दृढ करणारा सण आहे. आई-वडिलांच्या देहत्यागानंतर मुक्ताईंनी आपल्या मोठ्या भावंडांना मायेने सांभाळले, प्रेमाने जपले, आणि प्रसंगी त्यांच्या भल्यासाठी दटावले देखील. निवृत्ती महाराज, सोपान, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांचे नाते आदर्शवत आणि सुंदर होते. या भावंडांच्या जीवनात बहिण-भावाच्या पवित्र नात्याचे अनेक प्रसंग दिसतात.
मुक्ताई आणि तिचे तीन भाऊ एकमेकांना जपताना आणि सांभाळताना दिसतात. उदाहरणार्थ, मुक्ताईच्या अपमानामुळे व्यथित झालेल्या ज्ञानेश्वरांनी शब्दाचे रक्षण करण्यासाठी आपल्या पाठीची जळजळ होऊन मांडे भाजले. तसेच, ताटी उघडायला लावून ज्ञानेश्वरी लिहायला प्रेरणा देणारी मुक्ताईच होती. निवृत्तीनाथांसह मुक्ताईचे अध्यात्मिक नाते देखील आपल्याला त्याच भावनांचा अनुभव देईल.
या सुंदर, पवित्र नात्याचा उलगडा दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हा चित्रपट ३ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात बालपणीच्या संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर, मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी, निवृत्तीच्या भूमिकेत साहिल धर्माधिकारी, आणि सोपानच्या भूमिकेत अभीर गोरे दिसणार आहेत. याची निर्मिती रेश्मा कुंदन थडानी यांनी केली असून, ए.ए. फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था त्याची प्रस्तुती करीत आहे. संगीताची जबाबदारी अवधूत गांधी आणि देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे.
छायांकन संदीप शिंदे, संकलन सागर शिंदे आणि विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, ड्रोन आणि स्थिर छायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के, वेशभूषा सौरभ कांबळे यांनी केली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर, ध्वनीसंयोजन निखिल लांजेकर यांनी केले आहे, आणि पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांनी साकारली आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आणि कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत.