साताऱ्यात गुरुवारी (दि. 26 नोव्हेंबर)

साताऱ्यात २६ नोव्हेंबर रोजी भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमचा भव्य एअर शो होणार. हवाई कसरती, एअर वॉरियर ड्रिल, वायुसेना बँड आणि सैन्य संचलनाचे आकर्षण. वाहतुकीत बदल.

सातारा : ‘सैनिकांचा जिल्हा’ म्हणून देशभर ओळख असलेल्या सातारा जिल्ह्याच्या शौर्यशाली लष्करी परंपरेला उजाळा देणारा एक ऐतिहासिक सोहळा गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) साताऱ्यात रंगणार आहे. भारतीय वायुसेनेच्या जगप्रसिद्ध ‘सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीमचा थरारक एअर शो साताऱ्याच्या आकाशात अनुभवता येणार आहे. महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच एअर शो ठरणार असून, यामुळे साताऱ्याच्या पर्यटनाला नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे.

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सैनिक स्कूल, सातारा येथील फुटबॉल मैदानावरून आकाशातील हा रोमांचक सोहळा पाहता येणार आहे. भारतीय वायुसेनेच्या ‘सूर्यकिरण’ टीमचे वैमानिक आपल्या अचूक हवाई कौशल्याने आकाशात विविध चित्तथरारक कसरती सादर करणार आहेत. यासोबतच ‘एअर वॉरियर ड्रिल टीम’चे शिस्तबद्ध आणि दमदार सादरीकरणही कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

सायंकाळी देशभक्तीपर संगीत आणि सैन्य संचलन

या सोहळ्याचा उत्साह केवळ हवाई कसरतींपुरता मर्यादित राहणार नाही. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्रीमंत छत्रपती शाहू स्टेडियम येथे भारतीय वायुसेनेचे बँड पथक देशभक्तीपर सुमधुर धून सादर करणार आहे. त्याचबरोबर सैन्य दलाचे दिमाखदार संचलनही होणार असल्याने सातारकरांना लष्करी शिस्त, परंपरा आणि सामर्थ्याचा अनुभव घेता येणार आहे.

देशातील पहिली सैनिक स्कूल म्हणून गौरव असलेल्या सैनिक स्कूल, सातारा येथे होणाऱ्या या उपक्रमामुळे शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि तरुणांना भारतीय वायुसेनेचे कार्य, वैमानिकांचे साहस, शिस्त आणि आधुनिक तांत्रिक कौशल्य जवळून अनुभवण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः संरक्षण दलात करिअर करण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.

या कार्यक्रमासाठी राज्यभरातून पर्यटक, विद्यार्थी, माजी सैनिक आणि देशप्रेमी नागरिक साताऱ्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या ऐतिहासिक आणि देशभक्तीपर सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : शिक्षकांच्या जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी आमदार कौस्तुभ गावडे यांची मुख्यमंत्र्यांशी भेट

वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

एअर शो पाहण्यासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सातारा शहरातील वाहतुकीत गुरुवारी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत बदल करण्यात आला आहे.

  • पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
  • गोडोली नाका ते जिल्हा परिषद चौक या मार्गावरही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
  • वाहनधारकांनी अजंठा चौक, पारंगे चौक आणि एसटी स्टँड या पर्यायी मार्गांचा वापर करावा.

वाहतुकीतील बदलांना सहकार्य करून नागरिकांनी नियोजनपूर्वक प्रवास करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी केले आहे.

साताऱ्याच्या शौर्यशाली लष्करी परंपरेला सलाम करणारा आणि नव्या पिढीमध्ये देशसेवेची प्रेरणा जागवणारा हा सोहळा निश्चितच अविस्मरणीय ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *