पोस्टमन आणि पत्रांचा सुवर्णकाळ!

मोबाईलच्या युगात पोस्टमन आणि पत्रे काळाच्या पडद्याआड गेली. मात्र, ‘डाकिया डाक लाया’, ‘चिठ्ठी आई है’ आणि ‘संदेशे आते हैं’ यांसारख्या अजरामर गीतांनी पत्रांचे भावविश्व आजही जिवंत ठेवले आहे. हिंदी चित्रपटांतील पोस्टमन, प्रेमपत्रे आणि जुन्या आठवणींचा भावस्पर्शी आढावा.

एकेकाळी पोस्टमनची चाहूल लागली की घरातील प्रत्येकाचे कान टवकारले जायचे. त्याच्या हातातील पत्र कोणाचे असेल, त्यात काय लिहिले असेल, कोणाचा निरोप असेल, याची उत्सुकता मनात दाटून यायची. पत्र वाचताना कधी डोळ्यांच्या कडा ओलावायच्या, तर कधी चेहऱ्यावर आनंद फुलायचा. पत्र म्हणजे केवळ कागदावर उतरलेले शब्द नव्हते, तर दूर असलेल्या माणसांच्या भावनांना जोडणारा जिव्हाळ्याचा दुवा होता. एकेकाळी आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या पोस्टमन आणि पत्रांना हिंदी चित्रपटसृष्टीनेही भरभरून स्थान दिले. अनेक चित्रपटांतील प्रसंग आणि गाण्यांमधून पत्रांचे भावविश्व जिवंत झाले. मात्र, मोबाईल आणि डिजिटल संवादाच्या युगात पोस्टमनची प्रतीक्षा आणि पत्रांची हुरहूर हळूहळू काळाच्या पडद्याआड जाऊ लागली आहे. अशाच काही चित्रपटांचा आणि अजरामर गीतांचा हा आठवणींना उजाळा देणारा प्रवास…

चित्रपटांमधील पत्रांचे भावविश्व

आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. काही क्षणांत जगाच्या पाठीवरील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधता येतो. त्यामुळे दैनंदिन जीवनातील पोस्टमन आणि पत्रांचे महत्त्व कमी झाले आहे. त्याचे प्रतिबिंब चित्रपटसृष्टीतही उमटले. पूर्वी चित्रपटांमध्ये पोस्टमनची वाट पाहणारी माणसे, पत्र वाचताना भावुक होणारे चेहरे आणि एखाद्या निरोपाभोवती फिरणाऱ्या कथा पाहायला मिळायच्या. आता मात्र असे प्रसंग क्वचितच दिसतात.

एक काळ असा होता की पोस्टमन हा केवळ पत्रे पोहोचवणारा कर्मचारी नव्हता, तर अनेक कुटुंबांच्या सुख-दुःखाचा साक्षीदार होता. त्याच्या सायकलची घंटा ऐकली की घरातील माणसे दाराकडे धाव घ्यायची. घराच्या अंगणात, शेताच्या बांधावर किंवा पारावर बसून पत्रातील मजकूर पुन्हा पुन्हा वाचला जायचा. त्यावर चर्चा व्हायची. पत्रातील प्रत्येक शब्दाला भावनिक महत्त्व असायचे.

हिंदी चित्रपटसृष्टीनेही या भावविश्वाचे सुंदर दर्शन घडवले आहे. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात अभिनेत्री मंदाकिनी पत्राच्या प्रतीक्षेत असल्याचे दृश्य पाहायला मिळते. गंगोत्रीला जाणारे अनेक पर्यटक आजही या चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण झालेल्या पोस्ट ऑफिसला भेट देतात.

‘शोले’ चित्रपटातील एक प्रसंग तर आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. इमामसाहेबांची भूमिका साकारणारे ए. के. हंगल यांना पोस्टमन पत्र वाचून दाखवतो आणि शेवटी ‘फक्त आपका…’ असे म्हणतो. या छोट्याशा प्रसंगातही पत्रांमधून व्यक्त होणाऱ्या भावनांची ताकद जाणवते. त्या काळात एखाद्या पत्रातून नात्यांमधील जिव्हाळा अधिक घट्ट व्हायचा. दूर असलेल्या माणसाची आठवण, त्याच्या सुख-दुःखाची खबर आणि त्याच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधण्याची संधी पत्रांमुळे मिळायची.

‘पलकों की छांव में’, ‘नाम’, ‘संगम’, ‘ब्लॅकमेल’, ‘द लंचबॉक्स’, ‘आये दिन बहार के’, ‘कच्चे धागे’, ‘कन्यादान’ आणि ‘शक्ती’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये पत्रे आणि पोस्टमन यांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.

पत्रालाच एखाद्या पात्राप्रमाणे महत्त्व देणारा ‘आखिरी खत’ हा चित्रपटही या संदर्भात उल्लेखनीय आहे. त्यानंतर आलेल्या ‘वेलकम टू सज्जनपूर’ या चित्रपटाने पत्रलेखनाच्या व्यवसायाभोवती एक वेगळे सामाजिक वास्तव उभे केले. या चित्रपटाचा नायक बेरोजगार पदवीधर असतो. गावातील निरक्षर किंवा पत्र लिहिता न येणाऱ्या लोकांसाठी तो पत्रे लिहून आपला उदरनिर्वाह करतो. या साध्या कथेतून ग्रामीण समाजातील नाती, भावना आणि जगण्याचे वास्तव प्रभावीपणे समोर येते.

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द लंचबॉक्स’ हा चित्रपटही पत्रांच्या भावविश्वाचा आधुनिक संदर्भातील सुंदर आविष्कार आहे. मुंबईच्या धावपळीच्या जीवनात डब्याच्या माध्यमातून सुरू झालेला दोन अनोळखी व्यक्तींमधील पत्रव्यवहार पुढे भावनिक नात्यात रूपांतरित होतो. डिजिटल संवादाच्या काळातही कागदावर उतरलेल्या शब्दांमधून प्रेमाची नवी भावना कशी फुलू शकते, हे या चित्रपटाने दाखवून दिले.

गाण्यांतून जिवंत राहिलेला पोस्टमन

हिंदी चित्रपटांमधील पोस्टमन आणि पत्रांवर आधारित गाण्यांचा विचार केला, तर ‘पलकों की छांव में’ या चित्रपटातील ‘डाकिया डाक लाया’ हे गीत सर्वप्रथम आठवते. राजेश खन्ना यांनी या चित्रपटात पोस्टमनची भूमिका साकारली होती. त्यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले. किशोर कुमार यांच्या खास आवाजातील या गीताने पोस्टमनच्या आगमनाभोवती असलेला आनंद, उत्सुकता आणि भावनिक ओढ सुंदरपणे व्यक्त केली. आजही जुन्या पिढीतील अनेकांच्या ओठांवर हे गाणे सहज गुणगुणले जाते.

१९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नाम’ या चित्रपटाने तर पत्रातील भावनांची खोली थेट काळजाला भिडेल अशा पद्धतीने मांडली. ‘चिठ्ठी आई है, वतन से चिठ्ठी आई है’ हे गाणे ऐकताना आजही अनेकांचे डोळे पाणावतात. परदेशात गेलेल्या व्यक्तीला मायभूमीकडून आलेल्या पत्रातून मिळणारा आनंद, मातृभूमीची ओढ आणि आप्तस्वकीयांच्या आठवणी या गीतातून विलक्षण प्रभावीपणे व्यक्त झाल्या आहेत.

‘बॉर्डर’ चित्रपटातील ‘संदेशे आते हैं, हमें तड़पाते हैं’ हे गीतही याच भावविश्वाचा एक हृदयस्पर्शी आविष्कार आहे. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या मनातील भावना, कुटुंबीयांपासून दूर राहण्याचे दुःख आणि घरून येणाऱ्या पत्रांची आतुरतेने वाट पाहण्याची मनःस्थिती या गाण्यातून व्यक्त होते. देशसेवेच्या कर्तव्याबरोबरच मनात जपलेल्या कौटुंबिक नात्यांची ही भावनिक कहाणी आहे.

‘कच्चे धागे’ या चित्रपटात मौसमी चटर्जी यांच्यावर चित्रित झालेले ‘हाय-हाय एक लड़का मुझको खत लिखता है’ हे गाणेही विशेष लोकप्रिय ठरले. पत्रातून व्यक्त होणारे प्रेम, त्यातील लाडिकपणा आणि नायिकेच्या चेहऱ्यावरील हावभाव यामुळे या गीताने प्रेक्षकांची मने जिंकली.

हेदेखील वाचा : ‘रामायण’चे आकर्षण आजही कायम! 109 वर्षांचा चित्रपट प्रवास, नव्या पिढीलाही महाकाव्याची भुरळ

‘कन्यादान’ चित्रपटातील ‘लिखे जो खत तुझे, वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए’ हे गीत म्हणजे प्रेमपत्राच्या सौंदर्याचा एक अप्रतिम नमुना. शशी कपूर आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेल्या या गीताला मोहम्मद रफी यांच्या मधुर आवाजाने वेगळीच उंची प्राप्त करून दिली. प्रिय व्यक्तीला लिहिलेल्या पत्रातील शब्द कधी रंगीत स्वप्नांचे रूप धारण करतात, याचा अनुभव हे गाणे देते.

‘शक्ती’ चित्रपटातील ‘हमने सनम को खत लिखा, खत में लिखा’ हे गाणेही वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाते. प्रिय व्यक्तीला पत्र लिहिले जाते; मात्र ते पाठवायचे कुठे, तिचा पत्ता काय, हेच माहीत नसते. पत्र परत येण्यामागेही एक वेगळी हुरहूर आहे. विरह, प्रेम आणि अपूर्णतेची भावना या गीतातून अत्यंत सुरेल पद्धतीने व्यक्त झाली आहे.

धर्मेंद्र आणि आशा पारेख यांच्या ‘आये दिन बहार के’ या चित्रपटातील ‘खत लिख दे सांवरिया के नाम बाबू, कोरे कागज पे लिख दे सलाम बाबू, वो जान जाएंगे, पहचान जाएंगे’ हे गाणेही तितकेच खुमासदार आहे. प्रियकराला पत्र लिहिण्याची इच्छा, त्यातील लाजरेपणा आणि नायिकेचे नखरे यामुळे हे गाणे विशेष लक्षवेधी ठरले.

‘संगम’ चित्रपटातील ‘ये मेरा प्रेम पत्र पढ़कर, तुम नाराज न होना’ हे गीत तर प्रेम व्यक्त करण्याचे धाडस न करू शकणाऱ्या प्रेमिकांसाठी जणू एक भावनिक आधारच ठरले. मोहम्मद रफी यांच्या मनमोहक आवाजातील या गीताने प्रेमपत्राला एक वेगळीच ओळख दिली. आजही हे गाणे ऐकले की प्रेमाच्या जुन्या आठवणी जाग्या होतात.

याशिवाय पत्रांवर आधारित अनेक लोकप्रिय गीतांनी हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध केली. ‘हम दोनों मिलके कागज पे दिल के चिट्ठी लिखेंगे, जवाब आएगा’ (तुम्हारी कसम), ‘कबूतर जा जा जा, पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दे आ’ (मैने प्यार किया) आणि ‘चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश’ (दुश्मन) ही त्यातील काही ठळक उदाहरणे. या गीतांमधून प्रेम, विरह, प्रतीक्षा, आठवण आणि मनातील हळव्या भावना सुरांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या.

माध्यमे बदलली, भावनांचा ओलावा कायम!

एकेकाळी एखादे पत्र संपूर्ण चित्रपटाचे कथानक बदलून टाकायचे. कधी पत्रामुळे गैरसमज दूर व्हायचे, तर कधी नात्यांमध्ये दुरावा निर्माण व्हायचा. कधी एखाद्या पत्राची प्रतीक्षा हा चित्रपटाचा मुख्य विषय असायचा, तर कधी पत्रातील चार ओळींमधून संपूर्ण प्रेमकथा उलगडायची. पत्राभोवती फिरणारे हे भावविश्व चित्रपटांना एक वेगळीच संवेदनशीलता देत असे.

आज मात्र पत्रांची जागा ई-मेल आणि व्हॉट्सॲप संदेशांनी घेतली आहे. पोस्टमनच्या जागी मोबाईलच्या सूचना आल्या आहेत. कागद-पेनाची जागा की-बोर्ड आणि टचस्क्रीनने घेतली आहे. संवादाची साधने बदलली, तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली; पण माणसांच्या मनातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा मात्र तसाच आहे.

पूर्वी हाताने लिहिलेले पत्र गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवले जायचे. कधी त्यावर अत्तराचा सुगंध दरवळायचा, तर कधी अक्षरांमधूनच लिहिणाऱ्याच्या मनातील भावना ओळखता यायच्या. पत्र पुन्हा पुन्हा वाचले जायचे, जपून ठेवले जायचे. एखादे जुने पत्र अनेक वर्षांनंतर हातात पडले तरी त्यातील शब्द पुन्हा जुन्या आठवणींच्या दाराशी घेऊन जायचे.

आज संदेश पाठवण्यासाठी काही सेकंद पुरतात. उत्तरही क्षणार्धात मिळते. पण पत्राची वाट पाहण्यात जी उत्कंठा होती, पत्र हातात पडल्यावर जो आनंद मिळायचा आणि ते वाचताना मनात जी भावनांची आंदोलने उमटायची, त्याला खरोखरच तोड नाही.

काळ बदलला, माणसांच्या संवादाची माध्यमे बदलली आणि पोस्टमनही हळूहळू आठवणींचा भाग बनला. तरीही जुन्या चित्रपटांतील ती गाणी, पत्रांची प्रतीक्षा करणारे चेहरे आणि पोस्टमनच्या सायकलची घंटा आजही मनात कुठेतरी घुमत राहते. कारण पत्रे हरवली असतील, पोस्टमन काळाच्या पडद्याआड गेला असेल; पण त्या पत्रांमधून व्यक्त होणाऱ्या प्रेमाचा, आपुलकीचा आणि माणुसकीचा सुगंध मात्र अजूनही मनात दरवळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *