सांगली जिल्हा परिषदेतर्फे नवनियुक्त शिक्षकांसाठी ‘ज्ञानदीक्षा’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शाळांची गुणवत्ता वाढविण्याचे आवाहन करत मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी कामातील हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला.
सांगली : जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावून त्यांची प्रतिमा बदलण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शिक्षकांवर आहे. विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर ओळखून त्यांच्या प्रगतीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा. अध्यापनात नावीन्य, कल्पकता आणि प्रामाणिकपणाला प्राधान्य द्या. कामातील कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी नवनियुक्त शिक्षकांना दिला.
जिल्हा परिषदेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे यांच्या संकल्पनेतून शांतिनिकेतन येथे नवनियुक्त शिक्षकांसाठी ‘ज्ञानदीक्षा’ या एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नानाभाऊ हजारे आणि विस्तार अधिकारी डॉ. विमल माने उपस्थित होते.
नरवाडे म्हणाले, जिल्हा परिषद शाळांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकसहभाग वाढविणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकांनी शिक्षणप्रेमी व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना शाळेच्या विकासप्रक्रियेत सहभागी करून घ्यावे. शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या यशस्वी शैक्षणिक उपक्रमांची माहितीपटांच्या माध्यमातून प्रसिद्धी करावी. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता, कौटुंबिक परिस्थिती आणि अध्ययनस्तर समजून घेऊन त्याच्या प्रगतीसाठी ठोस उद्दिष्ट निश्चित करावे. शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अमोल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दैवत मानून त्यांचे भविष्य घडविण्याचे आवाहन केले. तारीश अत्तार यांनी शिक्षकांमध्ये संयम, बदल स्वीकारण्याची वृत्ती, नावीन्यता आणि कल्पकता असणे काळाची गरज असल्याचे सांगितले. संदीप पाटील यांनी लोकसहभागातून शाळेचा विकास, शिष्यवृत्ती मार्गदर्शन आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.
निलेश कांबळे, कृष्णात पाटोळे, कपिल कांबळे आणि बाबासाहेब परीट यांनी मॉडेल स्कूल, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, लोकसहभाग, वाचनसंस्कृती आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासंदर्भात आपले अनुभव मांडले.
अध्ययनस्तर चाचणीत दुसरीच्या विद्यार्थ्यांचे वाचन ४९ टक्केच!
जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतल्यामुळेच आपण प्रशासकीय सेवेत पोहोचू शकलो. शिक्षण आणि शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलण्याचे सामर्थ्य आहे, असे सांगत नरवाडे यांनी ‘विद्यावेध’ उपक्रमांतर्गत झालेल्या अध्ययनस्तर चाचणीची आकडेवारी मांडली.
या चाचणीत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचे अपेक्षित वाचनाचे प्रमाण ४९ टक्के, बेरीज करण्याचे प्रमाण ६१ टक्के, तर इंग्रजी वाचनाचे प्रमाण ६३ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. ही आकडेवारी लक्षात घेता विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर उंचावण्यासाठी शिक्षकांनी अधिक लक्ष केंद्रित करून विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने आपली जबाबदारी ओळखून काम करावे, असा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
