१. जतच्या क्रीडा संकुलात युवा क्रिकेटपटूंचा जल्लोष; लेदर बॉल स्पर्धेला सुरुवात
जिल्ह्यातील १२ संघांचा सहभाग; एस. जे. फाउंडेशनचा पुढाकार
जत : ग्रामीण भागातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने एस. जे. फाउंडेशनतर्फे आयोजित अंडर-१५ वयोगटातील ‘लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा-२०२६’ला सोमवारी (ता. १६) जत येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर उत्साहात प्रारंभ झाला. सांगली जिल्ह्यातील विविध भागांतील १२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक मोहन कुलकर्णी, विकास माने, एनएसयूआयचे जत तालुकाध्यक्ष योगेश बामणे, स्थानिक नेते नाथा पाटील, प्रवीण गडदे, सुरेश कोळी, निखिल साबळे आणि मिथुन माने यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
ग्रामीण भागातील लहान वयाच्या खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव मिळावा, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील कौशल्य विकसित व्हावे, तसेच भविष्यातील गुणवंत क्रिकेटपटू घडावेत, हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील १२ संघांमधील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे.
स्पर्धेसाठी नगरसेवक साहेबराव कोळी, परशुराम मोरे, इमरान गवंडी, मधुकर नरळे, सलीम नदाफ, डॉ. मदन बोर्गीकर, डॉ. शरद पवार, डॉ. रोहन मोदी, डॉ. मकसूद अहमद तांबोळी आणि डॉ. विवेकानंद राऊत यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रशांत झेंडे, आकाश बनसोडे आणि सुमित जगधने यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.
हेदेखील वाचा : अमृतवाडीतील कमी व्होल्टेजच्या समस्येसाठी शेतकऱ्यांचे उपोषण; जगताप-सावंत गट एकत्र
२. स्मार्ट मीटर सक्तीविरोधात जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवू नयेत; स्मार्ट मीटर कृती समितीची मागणी
जत : वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविले जात असल्याच्या कथित प्रकाराविरोधात सांगली जिल्हा स्मार्ट मीटर कृती समितीच्या वतीने जत तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तातडीने थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनानंतर महावितरणचे अधिकारी लोखंडे व माळी यांना कृती समितीचे अध्यक्ष चंदन चव्हाण आणि हणमंत कोळी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. जत तालुक्यात वीज ग्राहकांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
महावितरणचे काही कर्मचारी घरात प्रवेश करून ग्राहकांवर दबाव टाकत स्मार्ट मीटर बसवित असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे. वीज ग्राहक संरक्षण कायद्याचा दाखला देत ग्राहकांच्या हक्कांचा आदर केला जावा आणि त्यांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी मागणी करण्यात आली.
यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याने जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा जनतेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही चंदन चव्हाण आणि हणमंत कोळी यांनी दिला. शासनाचा स्पष्ट निर्णय नसताना अदानी कंपनीला फायदा पोहोचविण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.
यावेळी समीर नदाफ, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, नवनाथ पवार, अतुल ऐवळे, प्रशांत नाईक, तानाजी कटरे, बबन कांबळे, सागर चंदनशिवे, सागर सोलंकर, सागर तुराई, गणेश खिलारे, नितीन बंडगे, लियाकत बारुदवाले, गौस मकानदार, बालाजी बल्लारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
३. कंठी खून प्रकरणातील मुख्य संशयितास आठ दिवसांची पोलिस कोठडी
प्रेमसंबंधातून हत्या केल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष; २३ नोव्हेंबरपर्यंत कोठडी
जत : जत तालुक्यातील कंठी गावालगत असलेल्या मोठेवाडी येथील खरात वस्तीवर राजाक्का काशिराम खरात (वय ३०) या विवाहितेचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याप्रकरणी मुख्य संशयित मनोज हिम्मतराव कोळेकर (वय ३०, रा. कंठी) याला न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याला २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रविवारी (ता. १५) दुपारी साडेचारच्या सुमारास मोठेवाडी येथील खरात वस्तीवर ही घटना घडली होती. संशयिताने धारदार सुरा आणि चाकूने राजाक्का खरात यांच्यावर वार करून त्यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
प्रेमसंबंधातून तसेच भेटण्यास नकार दिल्याच्या रागातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस तपासातून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे कंठी आणि परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
मुख्य संशयिताला पोलिस कोठडी मिळाल्याने या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. हत्येमागील नेमकी कारणे आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
आयर्विन टाइम्स वृत्तसेवा | जत, सांगली
