जत तालुक्यातील अमृतवाडी ए. जी. फिडरवरील कमी व्होल्टेजच्या समस्येविरोधात शेतकऱ्यांचे महावितरण कार्यालयासमोर उपोषण. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे.
जत : जत तालुक्यातील अमृतवाडी ए. जी. फिडरवर सातत्याने कमी व्होल्टेजचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. शेतीपंप चालविताना येणाऱ्या अडचणी, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि अपुऱ्या दाबामुळे शेतीच्या कामांवर होणारा परिणाम याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन छेडले. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
अमृतवाडी ए. जी. फिडरवरील कमी व्होल्टेजची समस्या अनेक दिवसांपासून कायम आहे. वीजपुरवठा सुरू असतानाही पुरेसा दाब मिळत नसल्याने शेतीपंप व्यवस्थित चालत नाहीत. परिणामी पिकांना वेळेवर पाणी देणे कठीण झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर वारंवार लक्ष वेधूनही अपेक्षित तोडगा निघत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
आंदोलकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कमी व्होल्टेजची समस्या तातडीने दूर करावी, फिडरवरील वीजपुरवठा सुरळीत करावा आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले.
या आंदोलनात स्थानिक नेते संग्राम जगताप, धैर्यशील सावंत, संतोष भोसले, शिवलिंग बिराजदार, सुभाष बिराजदार, धर्मू बिराजदार, रोहित शिंदे, संतोष खोत, राहुल बाबर, राजू केदार, बाळू बाबर आदी सहभागी झाले होते.
माजी आमदारांचे नातू आणि सुपुत्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र
या आंदोलनाचे आणखी एक राजकीय वैशिष्ट्य ठरले. माजी आमदार विलासराव जगताप यांचे नातू संग्राम जगताप आणि माजी आमदार विक्रम सावंत यांचे सुपुत्र धैर्यशील सावंत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र येत आंदोलनात सहभाग घेतला. दोघांनीही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मांडला.
जगताप आणि सावंत या दोन्ही माजी आमदारांच्या कुटुंबातील पुढील पिढीतील युवा नेते शेतकऱ्यांच्या वीज समस्येच्या निमित्ताने एकाच आंदोलनात सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळातही या घटनेची चर्चा रंगली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून दोन्ही गटांचे युवा नेते एकत्र आल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.
