महेश भागवत हैदराबादचे नवे पोलीस आयुक्त

अहिल्यानगरच्या पाथर्डीचे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांची हैदराबाद पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. मानवी तस्करीविरोधातील कार्य आणि यूपीएससी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनामुळे त्यांची देशभरात ओळख.

मुंबई : महाराष्ट्राच्या मातीत घडलेल्या कर्तृत्ववान अधिकाऱ्यांनी देशाच्या विविध भागांत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. याच परंपरेतील आयपीएस अधिकारी आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक महेश भागवत यांची तेलंगणाची राजधानी हैदराबादच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीचे सुपुत्र असलेल्या भागवत यांच्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

तेलंगणा सरकारने नुकतीच २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची घोषणा केली. यामध्ये हैदराबादचे तत्कालीन पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांची फायर अँड डिजास्टर रिस्पॉन्सच्या महासंचालकपदी बदली करण्यात आली. तसेच, स्पेशल प्रोटेक्शन फोर्सच्या प्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांच्या जागी महेश भागवत यांची नियुक्ती करण्यात आली. १३ नोव्हेंबर रोजी बंजारा हिल्स येथील कार्यालयात त्यांनी पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. हैदराबादचे ते ६३ वे पोलीस आयुक्त ठरले आहेत.

या नियुक्तीचे महाराष्ट्रातून विशेष स्वागत होत आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून भागवत यांचे अभिनंदन केले. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो तरुणांसाठी महेश भागवत हे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि आदर्श आहेत. निःस्वार्थ सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समर्पित वृत्तीच्या जोरावर त्यांनी अनेक तरुणांना प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रेरित केले आहे, अशा शब्दांत नांगरे पाटील यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

महेश भागवत

मानवी तस्करीविरोधातील कामाची आंतरराष्ट्रीय दखल

महेश भागवत यांनी पोलीस सेवेत केवळ प्रशासकीय जबाबदारीच पार पाडली नाही, तर सामाजिक बांधिलकी जपत अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. विशेषतः महिला आणि बालकांच्या मानवी तस्करीविरोधात त्यांनी गेल्या १३ वर्षांपासून सातत्याने लढा दिला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आपल्या पथकाच्या मदतीने त्यांनी शेकडो बालमजूर आणि महिलांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले. मानवी तस्करी आणि देहव्यापाराच्या जाळ्यांविरोधातही त्यांनी प्रभावी कारवाई केली.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. अमेरिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हिरो अवॉर्ड’ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मानवी तस्करीविरोधातील लढ्यातील त्यांचे योगदान या गौरवामुळे जागतिक स्तरावर अधोरेखित झाले.

हेदेखील वाचा : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा

स्पर्धा परीक्षार्थींसाठी २४ तास उपलब्ध असणारे मार्गदर्शक

महेश भागवत यांची आणखी एक ओळख म्हणजे यूपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी. प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो विद्यार्थ्यांना ते सातत्याने मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ते वेळेचे बंधन न ठेवता उपलब्ध असतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या अनेक तरुण अधिकारी त्यांना आपले गुरू मानतात.

यापूर्वी त्यांनी तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून काम पाहिले आहे. तसेच, रचकोंडा पोलीस आयुक्तपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. आंध्र प्रदेशात कार्यरत असताना त्यांनी स्थानिक भाषा आत्मसात करण्यावर भर दिला. तेलुगू भाषेवर प्रभुत्व मिळवल्यामुळे स्थानिक नागरिक, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागांमध्ये काम करताना त्यांना मोठी मदत झाली.

कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी संवेदनशील आणि लोकाभिमुख अधिकाऱ्याची भूमिका बजावली होती. कर्तव्यनिष्ठा, सामाजिक जाणिवा, अभ्यासू वृत्ती आणि नव्या गोष्टी शिकण्याची जिज्ञासा या गुणांमुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पाथर्डीसारख्या ग्रामीण भागातून पुढे येत देशातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या हैदराबादच्या पोलीस आयुक्तपदापर्यंत मजल मारणारे महेश भागवत यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या नव्या जबाबदारीमुळे महाराष्ट्रासह देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *