कोलकात्यात माणुसकीला काळिमा!

दक्षिण कोलकात्यात आर्थिक वादातून किशोरवयीन मुलाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्यात आले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दोन अल्पवयीन मुलांसह तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

दक्षिण कोलकाता : आर्थिक वादातून एका किशोरवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्या अंगावर पेट्रोल ओतत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना दक्षिण कोलकात्यात उघडकीस आली आहे. या अमानुष कृत्याचे चित्रीकरण करून व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर रील तयार करण्याच्या हव्यासातून हा हल्ला करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

हेदेखील वाचा: सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! आधारऐवजी बायोमेट्रिक आणि मतदार ओळखपत्राची पडताळणी?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. किशोरवयीन मुलगा घरी परतत असताना आरोपींनी त्याला रस्त्यात अडवले आणि लेनिन नगर परिसरातील एका तलावाजवळ नेले. तेथे त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. त्यानंतर जबरदस्तीने त्याच्या डोक्यावर हेल्मेट घालून अंगावर पेट्रोल ओतण्यात आले. एवढेच नव्हे, तर त्याला पेट्रोल पाजण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक आरोपी स्कूटरच्या डिक्कीतून पेट्रोलची बाटली काढून मुलाच्या अंगावर पेट्रोल ओतताना दिसतो. त्यानंतर आगपेटीतील काडी पेटवून मुलाच्या अंगावर फेकण्यात येते. क्षणार्धात त्याच्या अंगाला आग लागते. आगीच्या ज्वाळांनी वेढलेला हा मुलगा वेदनेने किंचाळत इकडे-तिकडे धावत असल्याचे व्हिडिओत दिसते. त्याचवेळी स्थानिक नागरिक त्याला वाचवण्यासाठी धाव घेत असल्याचेही दिसून येते.

कोलकात्यात माणुसकीला काळिमा!

या घटनेत किशोरवयीन मुलाच्या छाती आणि पोटाचा भाग भाजला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पीडिताच्या कुटुंबीयांनी या हल्ल्यामागे आर्थिक व्यवहारातील वाद असल्याचा आरोप केला आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी पीडित मुलाने आरोपींपैकी एकाकडून ५०० रुपये उधार घेतले होते. त्याने ही रक्कम परत केली असतानाही त्याच्यावर असा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणी गरफा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन अल्पवयीन मुलांसह तीन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी सोशल मीडियावर रील तयार करण्यासाठी या घटनेचे चित्रीकरण केले होते का, तसेच हल्ल्यामागे आर्थिक वादाव्यतिरिक्त अन्य काही कारण होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासातून एखाद्याच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींच्या चौकशीतून हल्ल्यामागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *