दुष्काळग्रस्त तालुक्यांत मुख्यमंत्री सहायता निधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय. खरीप २०२६ मध्ये ट्रिगर-१ अंतर्गत दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांत मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू होणार. गरजू रुग्णांना उपचार आणि आर्थिक मदत मिळणार.

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील गरजू रुग्णांना वेळेत उपचार आणि आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची यंत्रणा थेट तालुकास्तरावर पोहोचणार असून, दुष्काळ जाहीर झालेल्या पात्र तालुक्यांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक कक्षासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ अंतर्गत दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या सर्व तालुक्यांमध्ये ही व्यवस्था कार्यान्वित केली जाणार आहे. संबंधित पंचायत समिती कार्यालयात हा कक्ष सुरू होईल. जिल्हाधिकारी स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करतील. त्यांच्या मदतीसाठी लिपिक आणि टंकलेखक उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

आधी सरकारी योजनांचा लाभ, नंतर मुख्यमंत्री निधीतून मदत

गरजू रुग्णांना उपचार मिळवून देताना प्रथम आयुष्मान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजना, कामगार विभागाच्या आरोग्य योजना तसेच धर्मादाय रुग्णालयांमधील उपलब्ध सुविधांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. या योजनांसाठी अपात्र ठरणाऱ्या रुग्णांचे अर्ज संलग्न रुग्णालयांमार्फत ऑनलाइन प्रणालीद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मंजुरीसाठी पाठवले जातील. यासाठी तालुकास्तरीय कक्ष रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन करणार आहे.

उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि आशा सेविकांच्या माध्यमातून गरजू रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. कोणताही रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी कक्षावर सोपविण्यात आली आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मुख्यमंत्री सहायता निधी

तालुका आणि जिल्हास्तरावर स्वतंत्र समित्या

या यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका आणि जिल्हास्तरावर आरोग्य समन्वय समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष स्थानिक आमदार असतील, तर उपविभागीय अधिकारी (महसूल) सहअध्यक्ष म्हणून काम पाहतील. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन आणि केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी सदस्य असतील. तालुका कक्षप्रमुख सदस्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळतील.

जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष पालकमंत्री, सहअध्यक्ष जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य सचिव असतील. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील दोन समाजसेवकांचा अशासकीय सदस्य म्हणून समावेश केला जाणार आहे.

हेदेखील वाचा: गोकुळच्या सत्तासंघर्षात महायुतीला बळ; 4 नामनिर्देशित संचालकांना मतदानाचा अधिकार

आरोग्य शिबिरे, फिरती वैद्यकीय पथके आणि तज्ज्ञ डॉक्टरांची मदत

दुष्काळग्रस्त भागातील आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र मेडिकल परिषद, स्थानिक वैद्यकीय संघटना आणि खासगी रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. आरोग्य शिबिरांचे आयोजन करून रुग्णांना आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून दिले जातील.

दोन्ही समित्यांना महिन्यातून किमान दोन बैठका घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुर्गम भाग, मोठी लोकसंख्या असलेली गावे आणि आरोग्य सुविधांची कमतरता असलेल्या परिसरांना प्राधान्य दिले जाणार आहे. पिण्याच्या पाण्याशी संबंधित आजार, उष्णतेमुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या, फिरती वैद्यकीय पथके आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवांचे नियोजन समित्या करणार आहेत.

महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

तालुक्याचा अहवाल थेट मंत्रालयापर्यंत

तालुकास्तरीय कक्षाकडून दैनंदिन कामकाजाचा आणि आयोजित आरोग्य शिबिरांचा अहवाल जिल्हा कक्षाकडे पाठवला जाईल. जिल्हा कक्ष सर्व तालुक्यांचे अहवाल एकत्रित करून मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे सादर करेल. त्यामुळे मदतकार्याचा नियमित आढावा घेणे आणि आवश्यक उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीची यंत्रणा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तालुकास्तरावर स्वतंत्र कक्ष सुरू झाल्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील गरजू रुग्णांची वेळेत ओळख पटवून त्यांना योग्य उपचार आणि आर्थिक मदत मिळवून देणे सोपे होणार आहे.

कोणताही गरजू रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *