माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने पत्नीचा छळ करून तिचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या कुमार जाधवला सांगली जिल्हा न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सांगली : पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या पतीला सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय १० हजार रुपये दंड आणि पत्नीचा छळ केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक ७ एम. एस. काकडे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
या प्रकरणातील आरोपी कुमार भीमराव जाधव (वय ३८, रा. बामणोली, ता. मिरज) याने पत्नी ममता उर्फ सुनंदा कुमार जाधव (वय ३०) हिचा खून केला होता. पत्नीने माहेरच्या लोकांकडून पैसे आणून देण्यास नकार दिल्याने आरोपी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत होता. याप्रकरणी यापूर्वी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत आरोपीने प-त्नीसोबत पुन्हा वाद घातला. या वादातून संतापलेल्या आरोपीने प-त्नीच्या डोक्यात दगड घातला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ममता यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेदेखील वाचा : ईश्वरपूरच्या निहाल मुल्लाची महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघात निवड
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने न्यायालयासमोर विविध पुरावे सादर केले. त्यांची पडताळणी केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १० हजार रुपये दंड, तर कलम ४९८-अ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या आहेत.
सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी बाजू मांडली. या गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
