कुंभारी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये फार्मासिस्ट दिनानिमित्त आरोग्य जनजागृती कार्यक्रम. औषधांचा सुरक्षित वापर, कालबाह्यता तारीख, साठवणूक आणि फार्मसीतील करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
जत : जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आदर्श औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, विटा यांच्या वतीने कुंभारी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यश गिरीश गाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना औषधांचा सुरक्षित वापर, फुफ्फुसांचे आजार, आरोग्यदायी जीवनशैली तसेच औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘आपले औषध ओळखा’ या उपक्रमाच्या माध्यमातून औषधांच्या वेष्टनावरील आवश्यक माहिती, औषधांची कालबाह्यता तारीख आणि औषधांची योग्य साठवणूक याबाबत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.

औषधांचा वापर करताना डॉक्टरांचा किंवा फार्मासिस्टचा सल्ला घेणे, औषधांच्या लेबलवरील माहिती तपासणे आणि कालबाह्य औषधांचा वापर टाळणे याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला.
कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. मी. मा. सूर्यवंशी आणि वर्गशिक्षक कु. बी. आय. माळी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून यश गिरीश गाडवे यांनी काम पाहिले.
आदर्श औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील कु. सानिका घाडगे, सानिका जाधव, सोजल चौगुले, धनराज नाईक, साक्षी शिंदे, साक्षी बाबर, साक्षी माळी, तृप्ती पाटील आणि रेशमा मुळीक यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. औषधांविषयी योग्य माहिती घेऊन आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

