जत परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घ्या. माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यता, येळवीतील शहीद महादेव पवार चौक, उमदीतील कृषी उद्योग समूह, राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि जत शहरातील तरुणावर हल्ल्याची बातमी.
जत / प्रतिनिधी : जत तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय, कृषी आणि गुन्हेगारी घडामोडींना वेग आला आहे. माडग्याळ मेंढीला स्वतंत्र देशी जात म्हणून राष्ट्रीय मान्यता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे येळवी येथे शहीद जवान महादेव पवार यांच्या स्मरणार्थ मुख्य चौकाला त्यांचे नाव देण्यात आले. उमदी येथे नव्या कृषी उद्योग समूहाचा प्रारंभ झाला, तर जत शहरात तरुणावर हल्ल्याची घटना घडली.
माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय मान्यतेसाठी सावंतांचा पाठपुरावा
जत तालुक्याची ओळख आणि धनगर समाजाच्या कष्टाचे प्रतीक असलेल्या माडग्याळ मेंढीला स्वतंत्र देशी जात म्हणून राष्ट्रीय मान्यता मिळावी, यासाठी २०२२ पासून तत्कालीन मंत्री सुनील केदार यांच्याकडे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पाठपुरावा केला होता, असा दावा जत काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
जत तालुका दुष्काळी असल्याने अनेक शेतकरी आणि धनगर बांधवांसाठी मेंढीपालन हा उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे. राष्ट्रीय मान्यतेमुळे माडग्याळ मेंढीचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन, संगोपन आणि प्रजननाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
माडग्याळ मेंढीला मिळालेली मान्यता ही हजारो धनगर बांधवांच्या कष्टाची पावती असल्याचे विक्रमसिंह सावंत यांनी म्हटले आहे. शासनाने या जातीच्या संवर्धनासाठी विशेष योजना, प्रजनन केंद्रे, आर्थिक मदत आणि आधुनिक तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
येळवीतील चौकाला शहीद जवान महादेव पवार यांचे नाव
देशासाठी बलिदान देणारे येळवीचे सुपुत्र शहीद जवान महादेव पवार यांच्या स्मरणार्थ येळवी येथील मुख्य चौकाला ‘वीर जवान शहीद महादेव पवार चौक’ असे नामकरण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
ग्रामसभेत करण्यात आलेल्या मागणीनंतर याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर चौकाला शहीद जवानाचे नाव देण्यात आले. वीरपत्नी लक्ष्मी पवार, कन्या समता पवार, सरपंच आरतीताई अंकलगी, पोलीस पाटील वंदनाताई माने-पाटील, माजी सैनिक संघटनेचे वसंत भंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
उमदीत पाटील कृषी उद्योग समूहाचा प्रारंभ
शेतकऱ्यांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी उमदी येथे ‘पाटील कृषी उद्योग समूहा’चा प्रारंभ करण्यात आला. उमदी-पंढरपूर रोडवरील पाटील हॉस्पिटल्ससमोरील परिसरात उद्घाटन समारंभ झाला.
वीर मल्लकारसिद्ध देवस्थान, गदगीचे पुजारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विठ्ठल चव्हाण, रोहिदास सातपुते, मल्लिकार्जुन सुरगोड, वहाब मुल्ला, मदगौडा बागी यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. कृषी क्षेत्रातील विविध गरजा पूर्ण करून शेतकऱ्यांच्या विश्वासाला नवी दिशा देण्याचा मानस समूहाचे प्रोप्रायटर रणजीत शिवाजीराव पाटील आणि डॉ. राहुल शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला.
हेदेखील वाचा : sangli crime : सांगलीत 300 किलो गांजा जप्त; 1 कोटी 75 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
‘मनुस्मृती जाळा, लोकशाही वाचवा’; जतच्या कार्यक्रमात भाजपवर टीका
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त जत येथे आयोजित व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्यात माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप समाजात मनुस्मृती लादून विषमता निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
माजी मंत्री महादेव जानकर यांनीही भाजपला साथ देणे ही मोठी चूक झाल्याचे सांगत भाजपविरोधात रणशिंग फुंकल्याचे जाहीर केले. ‘भाजपला गाडा’ असे आवाहन त्यांनी केले. विलासराव जगताप यांनी भाजप तसेच शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर टीका केली. यावेळी विक्रमसिंह सावंत, प्रा. सुकुमार कांबळे, प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
जत शहरात तरुणावर कोयता-लोखंडी रॉडने हल्ला
जत शहरात बहिणीसोबत फिरताना पाहिल्याने जाब विचारणाऱ्या २० वर्षीय तरुणावर दोघांनी कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना शनिवारी, २२ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या प्रकरणी तुषार सागर माने आणि अक्षय सावंत, दोघेही पंढरपूर येथील रहिवासी, यांच्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, संबंधित तरुणाने दोन तरुणांना जाब विचारल्यानंतर वाद झाला. त्यानंतर संशयितांनी शिवीगाळ करून कोयत्याच्या मागील बाजूने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. तरुणाला खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेत वापरण्यात आलेली मोटरसायकल विना क्रमांकाची असल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे. घटनेचा पुढील तपास जत पोलीस करीत आहेत.
जत तालुक्यातील आठ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असली, तरी जत व आटपाडी तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. सध्या १४ गावे आणि ८१ वाड्यांमधील २० हजार ५९० नागरिक व ४४ हजार २३९ पशुधनाला पाणीटंचाईची झळ बसत आहे. टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने १२ टँकर तैनात केले आहेत. तसेच १७ खासगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवला आहे.
यंदाचा पावसाळा तसा उशिराच सुरू झाला. जून महिना बऱ्यापैकी कोरडा गेला. मात्र, जुलै महिन्यात पावसाने कसर भरून काढताना तब्बल १७८.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, पावसाचा जोर जिल्ह्याच्या पश्चिम भागात अधिक राहिला. सध्या पावसाळी वातावरण असले तरी ऑगस्टमध्ये म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांत कमी पाऊस झाला आहे.
जत तालुक्यातील सिंदूर, कोळगिरी, सोन्याळ, सुसलाद, दरीकोणूर, लमाणतांडा, एकुंडी व काराजनगी या गावांत आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच सिंदूर, एकुंडी आणि येळवी येथे विंधन विहिरी व विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
