Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेलात ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार. चुकीच्या रूमचे दार वाजवल्याने प्रकार उघड; सीसीटीव्हीच्या मदतीने ३ तासांत आरोपी अटकेत.
छत्रपती संभाजीनगर | आयर्विन टाइम्स प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये ३० वर्षीय विवाहितेवर तिघा तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. केवळ चुकीच्या खोलीचे दार वाजवल्यामुळे हा अमानुष प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पीडिता खासगी रुग्णालयात काम करत असून, तिचा पती खासगी कंपनीत नोकरी करतो. आर्थिक गरजेमुळे तिने भोकरदन येथील एका मित्राकडे मदत मागितली होती. त्या मित्राने तिला संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावले. बुधवारी दोघेही हॉटेलमधील १०५ क्रमांकाच्या खोलीत थांबले होते.

चुकीच्या खोलीचे दार ठोठावले अन् आयुष्य हादरवणारा प्रसंग घडला
रात्री सुमारे ११ वाजता पीडिता फोनवर बोलण्यासाठी हॉटेलच्या बाहेर आली होती. परत येताना तिने चुकून १०५ ऐवजी २०५ क्रमांकाच्या खोलीचे दार ठोठावले. त्या खोलीत तिघेजण मद्यप्राशन करत होते. मद्यधुंद अवस्थेतील आरोपींनी तिला जबरदस्तीने खोलीत ओढून दार बंद केले.
यानंतर तिला बळजबरीने बिअर पाजून, पहाटेपर्यंत तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करण्यात आला. पहाटे तीन ते चारच्या दरम्यान संधी साधून पीडितेने खोलीचा दरवाजा उघडत आरडाओरड केली आणि आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर तिने थेट वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या तीन तासांत आरोपी अटकेत
पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांतनगर पोलिसांनी अत्यंत जलद कारवाई करत अवघ्या तीन तासांत तिन्ही आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे घनश्याम भाऊलाल राठोड (२७), ऋषिकेश तुळशीराम चव्हाण (२५) आणि किरण लक्ष्मण राठोड (२५) अशी असून, तिघेही जवाहर कॉलनी परिसरातील रहिवासी आहेत.
हॉटेल बुकिंगवेळी दिलेली माहिती, तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जिन्सी, मोंढा आणि भानुदासनगर परिसरातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सकाळी हॉटेलमधून पळ काढल्यानंतर त्यांनी मोबाईल फोन बंद करून ठेवले होते.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः हॉटेल व लॉजमध्ये सुरक्षा व्यवस्था किती सक्षम आहे, याचा पुन्हा एकदा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपींना तात्काळ अटक झाली असली, तरी अशा घटनांची पुनरावृत्ती थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Married Woman Gang-Raped in Hotel in Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar | Correspondent:
A 30-year-old married woman was allegedly gang-raped by three men in a hotel near the railway station in Chhatrapati Sambhajinagar on Thursday night. The incident occurred after the woman mistakenly knocked on the wrong hotel room door. The accused dragged her inside and assaulted her.
The victim managed to escape in the early hours and reported the matter to Vedantnagar police. Based on CCTV footage and hotel records, police arrested all three accused within three hours. Further investigation is underway.
