महाराष्ट्र टॉप 6 न्यूज: मुंबईच्या नेव्ही नगरातील दुर्दैवी घटना, अजय देवगण व शाहरुख खानला FDA नोटीस, संभाजीनगरमध्ये जॅमरमुळे कार पेटवली, आणि बावनकुळेंना राजस्थानची जबाबदारी.
१. स्वातंत्र्यदिनी मुंबई हादरली! नेव्ही नगरात नौदल कर्मचाऱ्यासह पत्नी व दोन बालकांचा मृतावस्थेत आढळली

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात अत्यंत धक्कादायक घटना घडली. भारतीय नौदलातील एका कर्मचाऱ्यासह त्यांची पत्नी आणि दोन चिमुकली मुले (वय ३ वर्षे आणि २ महिने) राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
नौदल कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी आणि पत्नी व मुलांना विष दिल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांसह भारतीय नौदलाने या प्रकरणी सखोल तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
२. पान मसाला जाहितीप्रकरणी अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना FDA ची कारणे दाखवा नोटीस

मुंबई : पान मसाल्याच्या सरोगेट (अप्रत्यक्ष) जाहितीप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्रात जुलै २०२६ च्या आदेशानुसार पान मसाल्याच्या विक्री व वितरणावर वर्षभरासाठी बंदी असताना, सेलिब्रिटींकडून अशा ब्रँडची जाहिरात केली जात असल्याचा आरोप आहे. FDA ने अजय देवगण यांच्या जुहू येथील, शाहरुख खान यांच्या ‘मन्नत’ आणि टायगर श्रॉफ यांच्या प्रॉडक्शन हाऊसला या नोटीसा पाठवल्या आहेत.
३. प्रशासनाच्या कारभारावर संताप! छत्रपती संभाजीनगरमध्ये जॅमर लावल्याच्या रागातून चालकाने पेटवली स्वतःची कार
छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावर पार्क केलेल्या कारला पोलिसांनी जॅमर लावल्यानंतर आणि विनंती करूनही तो न काढल्याने संतप्त झालेल्या एका चालकाने भररस्त्यात स्वतःचीच कार पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली.
चालकाचा आरोप आहे की, त्याने पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडे वारंवार विनंती केली होती, मात्र दाद न मिळाल्याने संतापाच्या भरात त्याने हे पाऊल उचलले. भररस्त्यात कार पेटल्याने परिसरात खळबळ उडाली असून प्रशासकीय कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
४. उत्सवातील प्रसादात ‘ऑरामाईन’ या विषारी रसायनाचा वापर? नगरसेवकाचे महापौरांना पत्र, तातडीने चौकशीची मागणी
मुंबई : मुंबईतील सण-उत्सवांच्या काळात वाटण्यात येणाऱ्या प्रसादात पेपर व चामड्याच्या उद्योगात वापरले जाणारे ‘ऑरामाईन’ हे रासायनिक पावडर वापरले जात असल्याचा खळबळजनक दावा नगरसेवक सचिन बाळकृष्ण पाटील यांनी केला आहे.
या रसायनामुळे कॅन्सर आणि किडनी निकामी होण्यासारखे गंभीर आजार होऊ शकतात, असा दावा करत त्यांनी महापौरांकडे प्रसादाची तपासणी करून अहवाल येईपर्यंत अशा पदार्थांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
५. भाजपची मोठी संघटनात्मक हालचाल: चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राजस्थान निवडणुकांची नवी जबाबदारी

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राजस्थानमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘सहप्रभारी’ म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, संघटनात्मक अनुभव असलेल्या बावनकुळेंना राजस्थानची जबाबदारी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
६. ‘१० लाख झाडे लावली, पण जगली किती?’; गिनीज रेकॉर्डवर अभिनेते सयाजी शिंदे यांचा थेट सवाल

धाराशिव : ‘हरित धाराशिव’ मोहिमेअंतर्गत १२ तासांत १० लाख झाडे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचा दावा केला जात असतानाच, अभिनेते सयाजी शिंदे यांनी यावर सवाल उपस्थित केले आहेत.
“झाडे लावण्यापेक्षा ती पुढील १० वर्षे जगवणे महत्त्वाचे आहे. केवळ एका दिवसाचा विक्रम नोंदवण्यापेक्षा किती झाडे जिवंत राहिली याचाही विचार व्हावा,” असा टोला त्यांनी लगावला. या कार्यक्रमात सयाजी शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील संवाद चांगलाच रंगला.
