Sangli ZP Election

Sangli ZP Election: सांगली महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे लक्ष. आरक्षणाचा पेच, प्रशासकराज आणि २१ जानेवारीच्या सुनावणीवर निवडणुकांचे भवितव्य ठरणार.

सांगली (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सांगली महापालिकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा सोमवारी झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा अद्याप न झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तरीही पुढील आठवड्यात ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या रणधुमाळीबरोबरच जिल्हा परिषद निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे सांगली जिल्हा परिषदेमध्ये आरक्षणाच्या सोडतीत ५० टक्क्यांची घटनात्मक मर्यादा ओलांडली नसल्याने सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक पहिल्या टप्प्यात होण्याची दाट शक्यता आहे.

झेडपीवर साडेतीन वर्षांहून अधिक काळ प्रशासकराज

सांगली महापालिकेत २० ऑगस्ट २०२३ पासून म्हणजेच सुमारे दोन वर्षे तीन महिने प्रशासकराज आहे. मात्र जिल्हा परिषदेत ही स्थिती अधिक गंभीर आहे. २१ मार्च २०२२ पासून जिल्हा परिषद प्रशासकाच्या ताब्यात असून सुमारे साडेतीन वर्षांहून अधिक काळ लोकप्रतिनिधींविना कारभार सुरू आहे. त्यामुळे झेडपीची निवडणूक आधी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र घोषणा लांबल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता वाढताना दिसत आहे.

आरक्षणाचा पेच आणि राज्यातील परिस्थिती

राज्यातील एकूण ३२ जिल्हा परिषदांपैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडल्याने निवडणूक प्रक्रियेत पेच निर्माण झाला आहे. या जिल्हा परिषदांबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे या निवडणुका सध्या अनिश्चिततेत अडकल्या आहेत.

उर्वरित १५ जिल्हा परिषदांमध्ये मात्र आरक्षण मर्यादा ओलांडलेली नसल्याने त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढील टप्प्यात होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने निवडणूक यंत्रणेकडून हालचालींना वेग आला आहे.

हेदेखील वाचा: Operation Tara: चांदोलीत वाघांचे आगमन | ‘ऑपरेशन तारा’मुळे ताडोबासारख्या पर्यटनाच्या नव्या शक्यता

सांगली जिल्हा परिषद पहिल्या टप्प्यात?

सांगली जिल्हा परिषदेमध्ये आरक्षणाच्या सोडतीत कोणतीही घटनात्मक अडचण नसल्यामुळे सांगली जिल्हा परिषद निवडणूक पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता अधिक आहे. तज्ज्ञांच्या मते, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हा परिषदेसाठी मतदान होऊ शकते.

यामुळे इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारीला वेग दिला असून, पक्षश्रेष्ठी, आमदार, नेते आणि पक्ष कार्यालयांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. “तिकिटाची माळ आपल्या गळ्यात पडावी” यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

आरक्षणावर २१ जानेवारीला निर्णायक सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण सोडतीत ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर २१ जानेवारी रोजी न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या निकालावर अनेक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाच्या नजरा लागून आहेत.

एकंदरीत, सांगलीत महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा कधी होते, याकडे इच्छुक, पक्ष आणि मतदारांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. येत्या काही दिवसांत निवडणूक आयोगाच्या घोषणेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.


Sangli Zilla Parishad Elections Likely in First Phase; Awaiting Official Announcement

Sangli (Irwin Times Correspondent):
While the Sangli Municipal Corporation elections have been announced, the schedule for Zilla Parishad and Panchayat Samiti elections is yet to be declared, causing uncertainty among aspirants. Experts, however, indicate that an official announcement for these local body elections is likely next week.

Sangli Zilla Parishad is expected to go to polls in the first phase, as the 50 percent reservation limit has not been exceeded. With court hearings on reservation issues scheduled for January 21 and a deadline to complete all local body elections by January 31, election preparations have gained momentum across the district.

Sangli ZP Election

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *