सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ. निलम दळवी आणि उपाध्यक्षपदी दीपक शेस्वरे यांची बिनविरोध निवड. सभासदांची एकमताने निवड, संस्थेच्या प्रगतीसाठी ग्वाही.
सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ. निलम महादेव दळवी (वानलेसवाडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, वानलेसवाडी) यांची, तर उपाध्यक्षपदी दीपक बापू शेस्वरे (कै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला, सांगली) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवड सभेत सर्व संचालक व सभासदांच्या एकमताने या निवडी झाल्या.

अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची सभा संस्थेच्या प्रधान कार्यालय, विश्रामबाग, सां-गली येथे उत्साहात पार पडली. या सभेला अध्यासी अधिकारी गणेश एस. काटकर, अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली हे उपस्थित होते. त्यांनी निवड प्रक्रिया सुरळीत पार पाडत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची घोषणा केली.
निवडीनंतर सौ. निलम दळवी यांनी विश्वास व्यक्त करताना सांगितले की, “संस्थेचा नावलौकिक वाढवण्यासाठी, सभासदांना पारदर्शक व चांगली सेवा देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. ठेवी वाढवणे, सभासदसंख्या वाढवणे आणि संस्थेची आर्थिक शाश्वतता मजबूत करणे हे आमचे प्रमुख ध्येय असेल.”
उपाध्यक्ष दीपक शेस्वरे यांनीही सभासदांचे आभार मानत सांगितले की, “संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळासह सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य घेऊन काम करणार असून, सेवाभावी दृष्टीकोन ठेवून संस्थेचा विकास घडवू.”

निवडीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी मार्गदर्शक आर. के. पाटील, जे. के. खराडे, अर्जुन पाटील, बी. एम. पाटील, बी. बी. पाटील, सी. वाय. जाधव, आर. के. जगताप, तसेच संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी आणि अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे ऑन. सेक्रेटरी निशांत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
