संगणक आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसचा धोका वाढतोय. मानदुखी, हातांना मुंग्या, बधिरपणा, औषधोपचार, फिजिओथेरपी आणि शस्त्रक्रियेबाबत जाणून घ्या महत्त्वाची माहिती.
सध्याच्या डिजिटल युगात संगणक, मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तासन्तास मान खाली झुकवून काम करणे, चुकीच्या पद्धतीने बसणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे मानेच्या मणक्यांशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होत आहे. यापैकी सर्वाधिक आढळणारा विकार म्हणजे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस. मानेच्या मणक्यांमधील हाडे, डिस्क आणि सांधे यांची हळूहळू झीज झाल्यामुळे हा त्रास उद्भवतो. वाढते वय, चुकीची बैठक, दीर्घकाळ एकाच स्थितीत बसून राहणे आणि व्यायामाचा अभाव ही या विकारामागील प्रमुख कारणे आहेत. बहुतांश रुग्णांवर औषधोपचार आणि फिजिओथेरपीच्या माध्यमातून प्रभावी उपचार करता येतात. मात्र, काही गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.
मानदुखीपासून हातांच्या बधिरतेपर्यंत लक्षणे
सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसमध्ये मानेच्या मणक्यांमधील डिस्क आणि सांध्यांची झीज होत जाते. त्यामुळे मान दुखणे, मान आखडणे, खांद्यांमध्ये जडपणा जाणवणे, डोकेदुखी आणि हातांना मुंग्या येणे अशी लक्षणे दिसू लागतात. काही रुग्णांमध्ये मज्जातंतूंवर दाब निर्माण झाल्यामुळे मानेतील वेदना खांद्यांमार्गे हाताच्या बोटांपर्यंत पोहोचतात. आजाराची तीव्रता वाढल्यास हातांची पकड कमजोर होणे, वस्तू हातातून निसटणे आणि चालताना शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

वेळीच तपासणी केल्यास गुंतागुंत टाळणे शक्य
सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मानदुखी किंवा हातांमध्ये मुंग्या येण्याचा त्रास सातत्याने जाणवत असल्यास वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. एक्स-रे, एमआरआय आणि गरजेनुसार मज्जातंतूंच्या कार्याची तपासणी करून आजाराचे स्वरूप आणि तीव्रता निश्चित केली जाते. त्यानुसार उपचारांची दिशा ठरवली जाते.
हेदेखील वाचा : डाळ शिजवताना येणारा पांढरा फेस काढावा की ठेवावा? जाणून घ्या फायदे आणि कारणे
औषधे आणि फिजिओथेरपी हा पहिला उपचार पर्याय
सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसच्या बहुतांश रुग्णांमध्ये सुरुवातीला शस्त्रक्रियेशिवाय उपचार करण्यावर भर दिला जातो. वेदना आणि सूज कमी करणारी औषधे, स्नायूंना आराम देणारी औषधे तसेच आवश्यकतेनुसार व्हिटॅमिन बी-१२ सारखी पूरक औषधे डॉक्टरांकडून दिली जाऊ शकतात. यासोबत फिजिओथेरपी, शरीराचे स्नायू ताणण्याचे व्यायाम आणि मानेचे स्नायू मजबूत करणारे व्यायाम उपयुक्त ठरतात.
उपचारांबरोबरच जीवनशैलीत बदल करणेही महत्त्वाचे आहे. संगणकावर काम करताना स्क्रीन डोळ्यांच्या समोरच्या उंचीवर ठेवणे, बसताना पाठीचा कणा सरळ ठेवणे, मोबाईलचा अतिवापर टाळणे आणि अधूनमधून उठून हालचाल करणे आवश्यक आहे. झोपताना मानेच्या नैसर्गिक स्थितीला आधार देणाऱ्या योग्य उशीचा वापर करावा. काही रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मर्यादित काळासाठी सर्व्हायकल कॉलर वापरण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
कोणत्या परिस्थितीत शस्त्रक्रियेची गरज भासते?
औषधोपचार आणि फिजिओथेरपी करूनही वेदना कायम राहणे, हातांचा अशक्तपणा वाढणे, चालताना तोल जाणे किंवा हात-पायांमधील बधिरपणा वाढत जाणे ही गंभीर लक्षणे आहेत. यावरून मणक्यांमधील मज्जातंतू किंवा स्पायनल कॉर्ड अर्थात मेरुरज्जूवर दबाव वाढत असल्याचे संकेत मिळू शकतात. अशा वेळी केवळ वेदना कमी करणारे उपचार पुरेसे ठरत नाहीत, तर मज्जातंतूंवरील दबावाचे मूळ कारण शोधून त्यावर उपचार करणे आवश्यक असते.
एमआरआय तपासणीत मणक्यांमधील डिस्क बाहेर सरकणे किंवा फुगणे, हाडांची अतिरिक्त वाढ होणे अथवा मज्जातंतू जाण्याचा मार्ग अरुंद झाल्याचे आढळल्यास डॉक्टर शस्त्रक्रियेचा विचार करू शकतात. विशेषतः मज्जातंतू किंवा मेरुरज्जूला कायमस्वरूपी इजा होण्याचा धोका असल्यास शस्त्रक्रिया आवश्यक ठरू शकते.
या शस्त्रक्रियेचा मुख्य उद्देश मज्जातंतूंवर दबाव निर्माण करणारा डिस्कचा किंवा हाडाचा अतिरिक्त भाग काढून त्यांना मोकळीक मिळवून देणे हा असतो. काही रुग्णांमध्ये मणक्यांना स्थिरता देण्यासाठी फ्युजन म्हणजेच मणके जोडण्याच्या तंत्राचा वापर केला जातो.
योग्य वेळी उपचार केल्यास गंभीर परिणाम टाळता येतात
योग्य वेळी केलेली शस्त्रक्रिया वेदना कमी करण्यास, शरीराची कार्यक्षमता सुधारण्यास आणि मज्जातंतूंची हानी अधिक वाढण्यापासून रोखण्यास मदत करू शकते. मात्र, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस झालेल्या प्रत्येक रुग्णाला शस्त्रक्रिया करावीच लागते असे नाही. आजाराची तीव्रता, तपासणीचे अहवाल, लक्षणांचे स्वरूप आणि रुग्णाची एकूण शारीरिक स्थिती लक्षात घेऊनच उपचारपद्धती निश्चित केली जाते.
सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसमध्ये शस्त्रक्रिया हा पहिला उपचार पर्याय नसून बहुतांश रुग्णांना औषधोपचार, नियमित व्यायाम, फिजिओथेरपी आणि जीवनशैलीतील आवश्यक बदल यांच्या मदतीने आराम मिळू शकतो. मात्र, हात-पायांचा अशक्तपणा, वाढता बधिरपणा किंवा चालताना तोल जाणे यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास उपचारांना विलंब करणे टाळावे. वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास भविष्यातील गंभीर गुंतागुंत आणि संभाव्य अपंगत्वाचा धोका कमी करता येऊ शकतो.
टीप : मानदुखी, हात-पायांमध्ये मुंग्या येणे, अशक्तपणा किंवा चालताना तोल जाणे अशी लक्षणे जाणवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःहून औषधे किंवा व्यायाम सुरू करू नयेत.
