जत पंचायत समिती गण आरक्षण जाहीर

📰 जत पंचायत समिती गण आरक्षण जाहीर झाले. महिलांसाठी नऊ जागा आरक्षित, सहा ठिकाणी खुल्या लढती, काहींना धक्का तर काहींना संधी. संपूर्ण तपशील जाणून घ्या.

(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी, जत):
जत तालुक्यातील पंचायत समिती गणांचे आरक्षण अखेर सोमवारी जाहीर झाले. या आरक्षण सोडतीनंतर अनेकांना धक्का बसला असून, काही नव्या चेहऱ्यांना राजकारणात संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जत येथे प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास आणि नायब तहसीलदार बाळासो सवदी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.

जत पंचायत समिती गण आरक्षण जाहीर

🔹 १८ सदस्यीय समितीत महिलांना नऊ जागा

जत पंचायत समितीमध्ये एकूण १८ सदस्य असतील. त्यापैकी दोन जागा अनुसूचित जातीसाठी, तर चार जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. महिलांसाठी एकूण नऊ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे महिला उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

अनुसूचित जातीतील उमराणी गण महिला आरक्षित झाला आहे, तर बाज व तिकोंडी हे गण ओबीसी महिलांसाठी राखीव ठरले आहेत. याशिवाय खुल्या गटातील मुंचडी, उमदी, जाडरबोबलाद, खोजनवाडी, माडग्याळ व कोसारी हे सहा गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.

हेदेखील वाचा: जत तालुक्यातील घडामोडी: जनावरांची बेकायदेशीर वाहतूक रोखली; जत पोलिसांची तत्पर कारवाई; कोळगिरीत 45 वर्षीय महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

🔹 सहा ठिकाणी खुल्या लढती

आरक्षणानुसार करजगी गण अनुसूचित जातीसाठी आणि संख व डफळापूर हे ओबीसीसाठी राखीव ठरले आहेत. त्यामुळे शेगाव, बनाळी, येळवी, गिरगाव, बिळूर आणि दरीबडची या सहा गणांमध्ये खुल्या लढती रंगणार आहेत.

🔹 आरक्षणाचे संपूर्ण चित्र

* जाडरबोबलाद – सर्वसाधारण महिला
* माडग्याळ – सर्वसाधारण महिला
* उमदी – सर्वसाधारण महिला
* करजगी – अनुसूचित जाती
* संख – ना. मा. प्र.
* गिरगाव – सर्वसाधारण
* दरीबडची – सर्वसाधारण
* तिकोंडी – ना. मा. प्र. महिला
* मुंचडी – सर्वसाधारण महिला
* खोजनवाडी – सर्वसाधारण महिला
* शेगाव – सर्वसाधारण
* कोसारी – सर्वसाधारण महिला
* डफळापूर – ना. मा. प्र.
* बाज – ना. मा. प्र. महिला
* बिळूर – सर्वसाधारण
* उमराणी – अनुसूचित जाती महिला
* बनाळी – सर्वसाधारण
* येळवी – सर्वसाधारण

🔹 काहींचा हिरमोड, काहींना नवी संधी

या आरक्षण प्रक्रियेमुळे जत तालुक्यातील अनेक प्रस्थापित नेत्यांना धक्का बसला आहे. तम्मणगौडा रवि पाटील, संजय तेली, सुभाष पाटील, सार्थक हिट्टी, महादेव अंकलगी, बसवराज बिरादार, संतोष पाटील, सोमन्ना हाक्के, विठ्ठल निकम, लक्ष्मण बोराडे आदींसह अनेक दिग्गज नेत्यांचा हिरमोड झाला आहे.

तर दुसरीकडे, प्रकाश जमदाडे, नाथाजी पाटील, सुनील पवार, संजीवकुमार सावंत, रविंद्र सावंत, माणिक पाटील, प्रमोद सावंत, मिलींद पाटील, सावित्री रवीपाटील, कविता पाटील यांसारख्या नव्या चेहऱ्यांना राजकारणात आपली छाप पाडण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

जत पंचायत समिती गण आरक्षणामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडू शकतो. महिला उमेदवारांचा सहभाग वाढणार असला तरी अनेक जुन्या नेत्यांना या वेळी आरक्षणाच्या फेरफारामुळे मागे रहावे लागणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नवे चेहरे आणि नव्या उत्साहासह रंगणार्‍या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *