जत: वयोवृद्ध महिलेस

जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
सांगली जिल्ह्यातील जत परिसरात एका वयोवृद्ध महिलेस रस्त्यात अडवून जबरीने दागिने हिसकावणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ९०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जत: वयोवृद्ध महिलेस

ही धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस अंमलदार अमर नरळे व अनिल कोळेकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कामगिरी साध्य झाली.

प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, ७ जून २०२५ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता अंकली रोडवरून जात असलेल्या ६० वर्षीय रखमाबाई दुधाळ यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले व पसार झाले. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०९(अ), ३(५) अंतर्गत गुन्हा क्र. ३७४/२०२५ म्हणून दाखल करण्यात आली होती.

हेदेखील वाचा: हरड: अनेक रोगांवर उपयुक्त; 6 ऋतूंमध्ये कोणत्या पदार्थांसोबत घ्यावी हरड म्हणजे लाभदायक ठरेल, जाणून घ्या; Useful for many diseases: Harad

सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पथकास खबर मिळाली की, बिरूदेव ऐवळे (वय २७) व मल्हारी घोडके (वय २२), दोघेही रा. वाघमोडे वस्ती रोड, बाज, ता. जत हे मोटारसायकलवरून मिरज रोडवरील सुतगिरणी टेक येथे जबरी चोरीतील सोने विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले.

त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी जुने मंगळसूत्र (१३.४०० ग्रॅम वजनाचे, किंमत अंदाजे ₹४०,०००/-) व वापरलेली मोटारसायकल (किंमत ₹५०,०००/-) असा एकूण ₹९०,०००/- किंमतीचा मुद्देमाल लुटल्याची कबुली दिली. पंचासमक्ष या वस्तू जप्त करण्यात आल्या असून आरोपींना पुढील चौकशीसाठी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

सदर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार सतिश माने, नागेश खरात, दऱ्याप्पा बंडगर, सागर लवटे, संदीप गुरव, महादेव नागणे, सागर टिंगरे, मच्छिंद्र बर्डे यांच्यासह सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी अभिजित पाटील, अजित पाटील यांचेही मोलाचे योगदान लाभले.

पोलीस अधीक्षकांनी जनतेस आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना घडल्यास तात्काळ माहिती द्यावी जेणेकरून पोलिसांना तत्पर कारवाई करता येईल. तसेच, वृद्ध व्यक्तींनी प्रवास करताना आवश्यक त्या काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *