मुंबई (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचे गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अन्यायाविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याच्या रागातून एका प्रामाणिक डॉक्टरवर बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने गंभीर आरोप लादण्यात आले आणि त्यांचे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात कार्यरत आरोग्य अधिकारी डॉ. मोहसीन खान यांच्याविरुद्ध एप्रिल २०२३ मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धानोरकर यांनी बनावट डिग्री बाळगल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. या आरोपावर आधारित कारवाईत खान यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
हेदेखील वाचा: जत तालुक्यातील आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार; मुख्याध्यापक निलंबित, चौकशी सुरू
मात्र, सत्याच्या बाजूने उभे राहत, डॉ. खान यांनी हा बनवाबनवीचा डाव उघड करण्यासाठी कायदेशीर लढा दिला. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर सोन्याबापू शेळके, सिल्लोड तालुक्याचे आरोग्य अधिकारी नासेर अहमद खान आणि आरोग्यसेवक किरण मोतीराम सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले नेमके?
डॉ. मोहसीन खान यांनी सिल्लोडच्या आरोग्य अधिकारी पदावर स्थिर नेमणुकीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तगादा लावला होता. मात्र, या मागणीला प्रतिसाद देताना डॉ. शेळके यांनी त्यांच्याकडून तीस हजार रुपयांची लाच मागितली. डॉ. खान यांनी याला नकार दिला. परिणामी, सूडबुद्धीने त्यांच्या विरोधात बनावट डिग्री बाळगल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेदेखील वाचा: crime news: दारूड्या बापाच्या त्रासाला कंटाळून 15 वर्षांच्या मुलीने केला त्याचा खून
केवळ इतकेच नाही तर, डॉ. खान यांना ‘बोगस डॉक्टर’ ठरवण्यासाठी बनावट शैक्षणिक कागदपत्रे तयार केली गेली. तरीही, डॉ. खान यांनी आपली खरी डिग्री आणि शैक्षणिक पात्रता न्यायालयात सिद्ध केली.
धक्कादायक माहिती समोर
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी डॉ. शेळके यांच्या निवासस्थानी छापा टाकला असता, डॉ. खान यांची खरी मूळ शैक्षणिक कागदपत्रे त्यांच्या ताब्यात असल्याचे आढळून आले. यावरून बनावट कागदपत्रांची खेळी आणि संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला.
या प्रकरणामुळे आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांची बेकायदेशीर वागणूक आणि भ्रष्ट वृत्ती उघडकीस आली आहे. एका प्रामाणिक डॉक्टरवर अन्याय केल्याचा हा प्रकार सर्वच स्तरांवरून निषेध होत आहे. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई होण्याची आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.