पत्नी

सारांश: कर्नाटकातील सुरेश यांना पत्नीच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. तपासातील निष्काळजीपणामुळे निर्दोष सुरेशला अन्याय सहन करावा लागला. अखेर पत्नी जिवंत सापडल्यानंतर कोर्टाने सुरेशची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेच्या निष्काळजी तपासाची गंभीर चूक उघड झाली.

पत्नी

मडिकेरी / मैसूरु (आयर्विन टाइम्स वृत्तसंस्था):
कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातील कुशलनगर तालुक्यात राहणाऱ्या कुरुबारा सुरेश या व्यक्तीवर पत्नीच्या खुनाचा आरोप ठेवत पोलिसांनी त्याला अटक केली आणि तो तब्बल तीन वर्षे तुरुंगात राहिला. मात्र, अलीकडेच ही पत्नी जिवंत असल्याचं समोर आलं आणि सुरेशची सुटका झाली. यातून पोलिसांची मात्र नाचक्की झाली आहे. पोलिसांनी निष्काळजीपणाने तपास केला आणि एक निरपराध व्यक्ती तीन वर्षं तुरुंगात खितपत राहिला.

हेदेखील वाचा: jat crime news: रेवनाळ येथे कौटुंबिक वादातून पत्नीचा मृत्यू; पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल, 4 दिवसांची पोलिस कोठडी

पत्नीच्या बेपत्ता होण्यापासून तुरुंगवासापर्यंतचा प्रवास
सुरेश आणि मल्लिगे यांचा विवाह सुमारे वीस वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन मुले – १८ वर्षांचा मुलगा आणि १५ वर्षांची मुलगी आहेत. २०२० मध्ये मल्लिगे अचानक गायब झाली. सुरेशने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याचदरम्यान कावेरी नदीच्या काठावर एका महिलेचे सांगाडा स्वरूपातील अवशेष आढळले. पोलिसांनी सुरेशवर दबाव टाकून तो सांगाडा मल्लिगेचाच असल्याचे कबूल करून घेतले आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. जून २०२१ मध्ये त्याला अटक करण्यात आली.

न्यायासाठी मुलांनीही लढा दिला
सुरेश तुरुंगात असताना त्याचा मुलगा कृष्णा दहावीमध्ये होता. एका विषयात नापास झाल्यानंतर त्याने शाळा सोडली आणि बहिणीचं शिक्षण आणि आजीची देखभाल करण्यासाठी काम सुरू केलं.
“आई जिवंत आहे की नाही, यापेक्षा आम्हाला वडील निर्दोष आहेत हे माहीत होतं. आम्ही रोज त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करत होतो,” असं कृष्णाने सांगितलं. आता तो पुन्हा दहावीचा अभ्यास करून पुढे शिकण्याचा निर्धार करतो आहे.

पत्नी

पत्नीचा शोध आणि सुटका
सप्टेंबर २०२३ मध्ये सुरेशला जामीन मंजूर झाला होता, पण जामीन भरण्याची आर्थिक ताकद नसल्याने तो आणखी एक वर्ष तुरुंगातच राहिला. अखेर सप्टेंबर २०२४ मध्ये तो बाहेर आला.
एप्रिल २०२५ मध्ये सुरेशने आपल्या मित्रांच्या मदतीने पत्नी मल्लिगेला बी शेट्टीगेरी (दक्षिण कोडगू) परिसरात गणेश नावाच्या व्यक्तीसोबत राहताना शोधून काढले. त्यांनी मल्लिगेचा व्हिडिओ रेस्टॉरंटमध्ये गणेशासोबत जेवताना शूट करून कोर्टात सादर केला. यानंतर कोर्टाने सुरेशला निर्दोष जाहीर करून तुरुंगातून मुक्त केले.

खऱ्या गुन्हेगाराचा शोध अद्याप बाकी
मल्लिगेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिने, “मी प्रेमामुळे पतीला सोडून दिलं आणि एका गावात राहायला गेले,” अशी कबुली दिली आहे.

हेदेखील वाचा:Teacher’s mental harassment: शिक्षिकेच्या मानसिक छळाची तक्रार; शिक्षक संघटनांकडून कारवाईची मागणी

तपासातील घोळ उघड
सुरेशचे वकील पांडू पुजारी यांनी सांगितले की, डीएनए अहवाल न मिळताच पोलिसांनी सुरेशविरोधात आरोपपत्र दाखल केलं. पोलिसांनी निष्काळजीपणाने तपास केला आणि एक निरपराध व्यक्ती तीन वर्षं तुरुंगात खितपत राहिला.

सुरेशचं हृदयद्रावक म्हणणं
“माझ्यावर खोटा आरोप ठेवण्यात आला. पोलिसांनी मला मारहाण केली, जबरदस्तीने कबुली दिली आणि तुरुंगात टाकलं,” असं सुरेश म्हणतो. तो पुढे म्हणतो, “मी फार शिकलेला नाही, पण सही करू शकतो. पोलिसांनी माझं ऐकून न घेता काही कागदांवर जबरदस्तीने सही करून घेतली.”

हा प्रकार केवळ एका व्यक्तीच्या आयुष्याचा नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला होता. न्याय मिळवण्यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली, पण अखेर सत्य बाहेर आलं आणि सुरेशची निर्दोष सुटका झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *