स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी मिरज तालुक्यातील आरग येथील पद्मावती मातेच्या मंदीरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी उघडकीस आणत आरोपी अक्षय मोरेला जेरबंद केले. गुन्ह्यातील ९,५४,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आधीही गुन्हे दाखल आहेत. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास वाढला आहे.
सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी मिरज तालुक्यातील आरग येथील प्रसिद्ध पद्मावती मातेच्या मंदीरात झालेल्या चोरीचा तपास वेगाने करून आरोपीला जेरबंद करत चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे.
हे देखील वाचा: Big budget films 2025: सलमान, अक्षय, देवगण, कमल हसन आणि ऋतिक यांच्या चित्रपटांची धमाल
घटनेची हकीकत
दि. ०८ जानेवारी २०२५ रोजी रात्री ७.३० ते दि. ०९ जानेवारीच्या सकाळी ५.३० या कालावधीत आरग गावातील पद्मावती मातेच्या मंदीरात चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने मंदीराच्या वरच्या दरवाज्याचा कडीकोयंडा उघडून आत प्रवेश केला आणि देवाच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.
गुन्हा दाखल
मंदीरातील चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. शितल आण्णासो उपाध्ये (वय ६०, रा. महावीर चौक, आरग) यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक २३/२०२५ दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची तपासणी आणि आरोपी जेरबंद
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश देण्यात आले. पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.
दि. १२ जानेवारी रोजी सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गुन्ह्यातील संशयित अक्षय अर्जुन मोरे (वय २७, रा. गोंदीलवाडी, पलुस) हा चो-री केलेले दागिने विकण्यासाठी पलुस रोडवरील पाचवा मैल येथे फिरत आहे.
सापळा आणि मुद्देमाल हस्तगत
पथकाने पाचवा मैल परिसरात सापळा रचून अक्षय मोरेला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडील सॅकमध्ये तपासणी केली असता, चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने सापडले. आरोपीने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली.
जप्त मुद्देमालाचा तपशील
1. सोन्याचे दागिने – ७,४९,४००/- रु. किंमतीचे १०६ ग्रॅम वजनाचे.
2. चांदीचे दागिने – १,४०,०००/- रु. किंमतीचे १.५ किलो वजनाचे.
3. मोटारसायकल– ६५,०००/- रु. किंमतीची बजाज पल्सर २२० सीसी काळ्या रंगाची मोटारसायकल.
एकूण जप्त मालमत्ता: ९,५४,०००/- रुपये.
आरोपीची पार्श्वभूमी
अक्षय मोरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वीही पलुस आणि मिश्रामबाग पोलीस ठाण्यांत त्याच्याविरुद्ध मालमत्तेविरोधातील गुन्हे दाखल आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरट्याने मंदिराच्या बाहेरील जिन्याने मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्यासमोरची लाकडी दाराची कडी कटावणीने उचकटून गाभाऱ्यात प्रवेश करूनदेवीचे दागिने पळविले.
पुढील तपास
सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि त्यांच्या पथकाने केलेल्या जलद कारवाईमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली.
या कामगिरीमुळे आरग ग्रामस्थांमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास वाढला आहे, तसेच चो-री झालेल्या मंदीराचे दागिने परत मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.