जत

पुणे फ्रेंड्स सर्कल अंकलगीच्या वतीने जत येथील स्पर्धेचे आयोजन

जत / आयर्विन टाइम्स
जत तालुक्यातील क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएलच्या धर्तीवर अंकलगी येथे यावर्षी तिसरी जत तालुका प्रीमियर लीग (जेटीपीएल) आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती हभप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेचे आयोजन पुणे फ्रेंड्स सर्कल अंकलगीच्या वतीने करण्यात येणार आहे. या वेळी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती व श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज अध्यक्षस्थानी होते.

जत

तुकाराम बाबा महाराज यांनी या स्पर्धेची घोषणा करताना सांगितले की, याआधीची जत तालुका प्रीमियर लीगची पहिली स्पर्धा जाडरबोबलाद येथे तर दुसरी स्पर्धा सोन्याळ येथे पार पडली होती. यावर्षी अंकलगी येथे होणारी तिसरी स्पर्धा अधिक उत्साहवर्धक होणार आहे. आयपीएलच्या पद्धतीवर आधारित या स्पर्धेत तालुक्यातील खेळाडूंवर बोली लावून संघ तयार केले जातील.

हे देखील वाचा: Kavthemahankal suicide news: माय-लेकराची विहिरीत उडी मारून आत्महत्या: कवठेमहांकाळ तालुक्यातील शोकांतिका; 2 दिवसांपासून होते बेपत्ता

स्पर्धेचे स्वरूप आणि खेळाडूंचा लिलाव

या स्पर्धेत १२ संघ सहभागी होणार असून प्रत्येक संघ मालक खेळाडूंवर बोली लावून आपला संघ तयार करणार आहेत. आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आपली नोंदणी केली आहे. २४ तारखेपर्यंत इच्छुक खेळाडूंनी अर्ज भरून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २७ तारखेला खेळाडूंचा लिलाव होणार असून यावेळी संघ मालक खेळाडूंवर बोली लावून त्यांचे संघ निश्चित करतील. लिलावानंतर स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

बक्षिसे आणि विशेष आकर्षणे

स्पर्धेतील विजेत्या संघासाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या विजेत्या संघाला ४० हजार रुपये रोख, दुसऱ्या विजेत्या संघाला ३० हजार रुपये, तिसऱ्या विजेत्या संघाला २० हजार रुपये तर चौथ्या विजेत्या संघाला १० हजार रुपये रोख बक्षीस दिले जाईल. त्यासोबतच ‘जेटीपीएल श्री संत बागडेबाबा स्मृतिचिन्ह – २०२४’ मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा: Maharashtra Crime News : 32 वर्षीय गर्लफ्रेंडची हत्या करून ‘दृश्यम’ चित्रपटासारखा मृतदेह लपवला; भारतीय लष्करातील जवान अटकेत; वाचा खूनाची भयानक कथा…

याव्यतिरिक्त, हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या वतीने सहभागी खेळाडूंना टी-शर्ट दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे, सहा चेंडूत सहा विकेट घेणाऱ्या उत्कृष्ट गोलंदाजाला बुलेट मोटरसायकल भेट म्हणून दिली जाईल.

स्पर्धेचे उद्दिष्ट

तुकाराम बाबा महाराज यांनी स्पर्धेचे उद्दिष्ट सांगताना स्पष्ट केले की, जतसारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील खेळाडूंना खेळासाठी व्यासपीठ मिळावे आणि तरुण मुलांनी खेळाकडे वळावे, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे या प्रीमियर लीगचे आयोजन करून तालुक्यातील क्रिकेटवेड्या तरुणांना एक नवा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हे देखील वाचा: जत शैक्षणिक न्यूज : राजे रामराव महाविद्यालयास नॅकच्या ‘अ’ मानांकनाचा सन्मान: गुणवत्तेचा कायमसाठी ध्यास – प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे

प्रमुख उपस्थिती

पत्रकार परिषदेत सुमित जगधने, रुपेश काटे, कुमार चौगुले, रफिक, विष्णू चव्हाण, भिमा गुड्डापूर, मारुती कांबळे, विजय नामद, धनाजी शिंदे, नितीन चव्हाण, पवन कांबळे, दयानंद कनमडी, प्रदीप बुरुटे, मोहन निकम, धरेश्वर चौगुले, प्रशांत तेलगाव, राम पुजारी, विकास चव्हाण, इंद्रजित गोदे, हनुमंत हळळी, रज्जाक शेख, सिद्धू गुरव, रशीद मुल्ला यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

जेटीपीएलच्या तिसऱ्या पर्वाची ही क्रिकेट स्पर्धा तालुक्यातील खेळाडूंसाठी एक मोठी संधी ठरणार आहे, ज्यात त्यांनी आपली कौशल्ये सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *