कवठाचा आकार असतो साधारणतः छोट्या नारळासारखा
कवठ, ज्याला इंग्रजीत ‘वूड अॅपल्स’ म्हणून ओळखले जाते, हे रुटेसी कुळातील एक विशेष फळ आहे. त्याचा आकार साधारणतः छोट्या नारळासारखा असतो, आणि त्याची साल हिरवट पांढऱ्या रंगाची, खरबरीत आणि जाड असते. फळाच्या झाडाची पाने बारीक आणि लांब असतात, ज्यामुळे हे झाड इतर झाडांपासून वेगळे ओळखले जाते.
फळ पिकले आहे की नाही हे कसे तपासणार?
फळ त्याच्या विटकरी रंगाच्या आंतरिक गरामुळे विशेष ओळखले जाते, ज्याची चव आंबट-गोड असते. हे फळ पिकले आहे की नाही हे तपासण्यासाठी एक सोपी पद्धत आहे – ‘बाउन्स टेस्ट’. जर तुम्ही फळाला कठीण पृष्ठभागावर पाडले आणि ते बाउन्स झाले, तर त्याचा अर्थ ते पिकलेले नाही. मात्र, पिकलेले फळ जमिनीवर विशिष्ट आवाज करीत पडते आणि बाउन्स होत नाही. पिकलेल्या फळाचा गर फिकट करड्या किंवा ‘टॉफी माकन’ रंगाचा असतो, जो खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक असतो.
संसर्गांपासून संरक्षण करण्यासाठी कवठ उपयुक्त
कवठ हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक फळ आहे. हे विटा-कॅरोटिनचे एक समृद्ध स्रोत आहे, जे शरीरात व्हिटामिन ‘ए’मध्ये रूपांतरित होते. व्हिटामिन ‘ए’ दृष्टी सुधारण्यासाठी आणि त्वचेला नितळ बनवण्यासाठी मदत करते. याशिवाय, फळात व्हिटामिन ‘सी’ मुबलक प्रमाणात आढळते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. संसर्गांपासून संरक्षण करण्यासाठी आणि शरीरातील विषाणूविरोधी लढाईसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पचनसंस्थेचं रक्षण करणारे फळ
कवठामध्ये रायबोफ्लेविन, कॅल्शिअम, आयर्न आणि फॉस्फरस या खनिजांचे प्रमाण देखील अधिक आहे, ज्यामुळे ते संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे फळ शीतकारी, पाचक, आणि यकृत व मूत्रपिंडं स्वच्छ करण्यासाठी विशेष ओळखले जाते. यामध्ये असलेल्या अँटी-मायक्रोबिअल गुणधर्मांमुळे घशाची काळजी घेण्यासाठी फळ अत्यंत उपयुक्त आहे. पचनसंस्थेचं रक्षण करणारे हे फळ पोटामध्ये अल्सर होतो तेव्हा आणि अपचन व बद्धकोष्ठतेवर गुणकारी ठरते.
कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि डोकेदुखी होण्याची शक्यता
कवठामध्ये प्रोटिन्सचा समृद्ध स्त्रोत असल्याने ते स्नायूंना झालेली दुखापत कमी करण्यासाठी आणि चयापचयाला बळ देण्यासाठी उपयोगी ठरते. त्वचा आणि केसांसाठीही हे अत्यंत लाभदायक आहे. मात्र, फळ प्रामुख्याने पिकलेलेच खावे, कारण कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि डोकेदुखी होण्याची शक्यता असते.
कवठाची चवदार चटणी
पिकलेल्या कवठाची चवदार चटणी बनविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. सर्वप्रथम कवठ फोडून त्यातील गराचे मोठे तंतू काढून टाका. नंतर हा गर हलके स्मॅश करून त्यात तीन टेबलस्पून गूळ, चिमूटभर हळद, तिखट, मीठ, हिंग आणि जिरे घाला. हे सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवा, आणि तुमची चटणी तयार आहे! ही चटणी जेवणात वापरल्यास जेवणाची चव द्विगुणीत होते.
हे फळ केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त फळ आहे. आपल्या आहारात याचा समावेश करून आपण आरोग्याचे अनेक लाभ मिळवू शकतो.