‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ मराठी चित्रपटाची घोषणा

मराठी चित्रपट ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ची पहिल्या पोस्टरद्वारे घोषणा. भाग्यश्री मोटे अभिनयासह क्रिएटिव्ह प्रोड्युसरच्या भूमिकेत दिसणार असून सामाजिक वास्तवावर विनोदी शैलीत भाष्य केले जाणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवरील प्रयोगशील चित्रपटांची निर्मिती होत आहे. आशयासोबतच वेगळी आणि लक्षवेधी शीर्षकेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याच मालिकेत आता ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ हा अनोख्या नावाचा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरद्वारे या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाच्या शीर्षकामुळेच त्याच्या कथानकाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सुदेश वसंतराव झावरे पाटील आणि अंकिता पानसे-शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पुंडलिक यशोदा लक्ष्मण धुमाळ यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. शंभो एंटरटेनमेंट आणि श्री महाकाल प्रॉडक्शन्स यांचा ‘अबीर’नंतरचा हा दुसरा चित्रपट आहे.

‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ मराठी चित्रपटाची घोषणा

या चित्रपटाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री मोटे यांची दुहेरी भूमिका. त्या या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असून, महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिनय करतानाही दिसणार आहेत. आकाश विष्णू शिंदे यांनी क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहिले आहे.

हेदेखील वाचा : डिसेंबर 2026 मध्ये बॉक्स ऑफिसवर धमाका! सलमान-शाहरुखसह ‘अ‍ॅव्हेंजर्स’, ‘ड्यून’चे चित्रपट होणार प्रदर्शित

सामाजिक वास्तवाला विनोदाची फोडणी

‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, सामाजिक आशय आणि विनोद यांची सांगड घालणारा ठरणार आहे. महाराष्ट्रासमोरील ज्वलंत प्रश्न, त्यातून निर्माण होणारी सामाजिक परिस्थिती आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील वास्तव यावर मनोरंजक शैलीत भाष्य करण्याचा चित्रपटाचा प्रयत्न असणार आहे. सामाजिक विषय मांडताना प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे. यासोबतच गीत-संगीताची सुरेल मेजवानीही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ मराठी चित्रपटाची घोषणा

भाग्यश्री मोटेच्या नव्या भूमिकेकडे लक्ष

भाग्यश्री मोटे यांनी मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. विविधांगी भूमिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भाग्यश्री आता अभिनयासोबतच क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणूनही नवी जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्या या दुहेरी भूमिकेविषयी चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

भाग्यश्री मोटे यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दमदार कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. तसेच अनुभवी आणि कुशल तंत्रज्ञांची टीमही चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी झाली आहे. चित्रपटातील कलाकार, कथानक आणि अन्य महत्त्वाचे तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे ‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ या आगळ्यावेगळ्या शीर्षकाच्या चित्रपटाबद्दल मराठी चित्रपटप्रेमींची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *