वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासून सेवा जोडणे, जुनी पेन्शन, टीईटी सक्ती रद्द करणे आणि मुख्यालयी राहण्याच्या अटींबाबत मुंबईत उपसभापती सचिन अहिर यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. शिक्षण विभागाला लेखी उत्तर देण्याचे निर्देश; विनंती अर्ज समितीमार्फत सुनावणीचे आश्वासन.
मुंबई : राज्यातील वस्तीशाळा शिक्षकांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या सेवा आणि पेन्शनविषयक प्रश्नांना आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिनभाऊ अहिर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर 2026) मुंबई येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा जोडणे, जुनी पेन्शन योजना, टीईटीची सक्ती आणि मुख्यालयी राहण्याच्या अटींसह शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला समाजवादी नेते व माजी आमदार कपिल पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, सरचिटणीस भरत शेलार, कार्याध्यक्ष दिनेश खोसे, कोषाध्यक्ष किशोर कदम आणि उपाध्यक्ष विनोद कडव उपस्थित होते.
जुनी पेन्शन आणि मूळ सेवा जोडण्याबाबत विचारणा
राज्यातील वस्तीशाळा शिक्षकांची सेवा त्यांच्या मूळ नियुक्ती दिनांकापासून ग्राह्य धरण्याच्या मागणीवर बैठकीत विशेष चर्चा झाली. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत माजी आमदार कपिल पाटील यांना जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात दिलेल्या आश्वासनानंतर शासनाने कोणती कार्यवाही केली, याची माहिती उपसभापती सचिन अहिर यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मागवली.
या प्रकरणी शिक्षण विभागाने तातडीने लेखी उत्तर सादर करावे, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे या प्रश्नाच्या प्रशासकीय पाठपुराव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

पेन्शनसाठी स्वतंत्र अर्ज केल्यास सुनावणी
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी वस्तीशाळा शिक्षकांनी स्वतंत्रपणे विहित प्रक्रियेनुसार विनंती अर्ज सादर केल्यास विधान परिषदेच्या विनंती अर्ज समितीमार्फत त्यावर सुनावणी घेण्यात येईल, असे आश्वासन उपसभापती अहिर यांनी दिले. विशेष म्हणजे, या समितीचे अध्यक्षपद स्वतः अहिर यांच्याकडे आहे.
पेन्शनचा अंतिम निर्णय होईपर्यंत शिक्षकांना विकल्प सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबतही शासनाने विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. यामुळे पेन्शनच्या प्रश्नावर न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
टीईटी सक्ती आणि अतिरिक्त गुणांवर चर्चा
शिक्षकांच्या टीईटी (TET) परीक्षेसंदर्भातील प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने टीईटीची सक्ती रद्द करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल करण्याबाबत चर्चा झाली. तसेच शिक्षकांच्या आजवरच्या सेवाकालावधीनुसार टीईटी परीक्षेत अतिरिक्त गुण देण्याच्या मागणीवरही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
मुख्यालयी राहण्याच्या अटीबाबत स्पष्ट व्याख्येची मागणी
शिक्षकांना मुख्यालयी राहण्याच्या शासनाच्या अटीसंदर्भातही महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मुख्यालय म्हणजे तालुका मुख्यालय की जिल्हा मुख्यालय, याबाबत शासनाने स्पष्ट व्याख्या निश्चित करावी, अशी सूचना माजी आमदार कपिल पाटील यांनी केली. हा प्रस्ताव शासनापुढे विचारार्थ ठेवण्याचे निर्देश उपसभापती सचिन अहिर यांनी दिले.
प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची आशा
उपसभापती सचिन अहिर हे स्वतः प्रख्यात कामगार नेते असल्याने शिक्षकांच्या प्रश्नांमधील बारकावे आणि त्यामागील वस्तुस्थिती त्यांना चांगल्या प्रकारे समजते. आजच्या बैठकीतील चर्चेत त्याची प्रचिती आली. प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी प्रथमच ठोस गती मिळाल्याचे समाधान माजी आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले.
शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी उपसभापती सचिन अहिर यांचे आभार मानले. या बैठकीमुळे वस्तीशाळा शिक्षकांच्या सेवा, जुनी पेन्शन आणि टीईटीसंदर्भातील प्रश्नांवर पुढील प्रशासकीय व विधिमंडळीय कार्यवाहीचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीने व्यक्त केली आहे.
