अॅलेक्सा आणि गुगल होमला पर्याय ठरणारी इंटरनेटशिवाय चालणारी ‘जार्विस’ स्मार्ट होम प्रणाली १६ वर्षीय विद्यार्थ्याने विकसित केली आहे. व्हॉइस कमांडद्वारे दिवे, पंखे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे नियंत्रित करता येणार आहेत.
मुंबई : घरातील टीव्ही, पंखे, दिवे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे नियंत्रित करण्यासाठी अॅलेक्सा किंवा गुगल होमसारख्या स्मार्ट स्पीकर्सचा वापर वाढत आहे. मात्र, या उपकरणांच्या कार्यासाठी प्रामुख्याने इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने इंटरनेटशिवाय काम करणारी स्मार्ट होम ऑटोमेशन प्रणाली विकसित करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगळे पाऊल टाकले आहे. ‘द नूब इंजिनिअर’ (The Noob Engineer) या नावाने इंटरनेटवर ओळखल्या जाणाऱ्या या विद्यार्थ्याने आपल्या उपकरणाला ‘जार्विस’ (Jarvis) असे नाव दिले आहे.
या प्रणालीच्या मदतीने केवळ व्हॉइस कमांड देऊन घरातील दिवे, पंखे आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे नियंत्रित करता येतात. विशेष म्हणजे, यासाठी इंटरनेट कनेक्शन किंवा बाह्य सर्व्हरची आवश्यकता भासत नाही.
आवाज दिल्यानंतर प्रणाली होते सक्रिय
या विद्यार्थ्याने आकाराने लहान आणि सुटसुटीत असे हार्डवेअर उपकरण तयार केले आहे. हे उपकरण घरातील स्विचबोर्डला जोडून विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नियंत्रण करू शकते. ‘जार्विस’ असा आवाज दिल्यानंतर प्रणाली सक्रिय होते आणि पुढील सूचना स्वीकारण्यास सज्ज होते. अॅलेक्सा किंवा गुगल होममध्ये विशिष्ट वेक वर्डच्या माध्यमातून उपकरण सक्रिय होते, त्याच धर्तीवर ही प्रणाली कार्य करते.
या प्रकल्पाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्याने एका व्हिडिओद्वारे दाखवले आहे. त्यामध्ये ‘ऑल लाईट्स ऑफ’ म्हणजेच घरातील सर्व दिवे बंद करा, तसेच ‘फॅन ऑन’ आणि ‘फॅन ऑफ’ अशा व्हॉइस कमांड दिल्यानंतर संबंधित उपकरणे तत्काळ सुरू किंवा बंद होत असल्याचे दिसून येते.

ऑफलाइन तंत्रज्ञानामुळे गोपनीयतेला प्राधान्य
सामान्य स्मार्ट स्पीकर्सना वापरकर्त्याच्या सूचना समजून घेण्यासाठी इंटरनेट आणि क्लाउड सर्व्हरची मदत घ्यावी लागते. मात्र, ‘जार्विस’ प्रणालीमध्ये ऑन-डिव्हाइस व्हॉइस रिकग्निशन आणि लोकल डेटा प्रोसेसिंग या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वापरकर्त्याने दिलेल्या सूचना स्थानिक पातळीवरच प्रक्रिया केल्या जातात.
ही प्रणाली इंटरनेटशी जोडलेली नसल्यामुळे व्हॉइस कमांड बाह्य किंवा परदेशी सर्व्हरवर पाठवल्या जात नाहीत. परिणामी, वापरकर्त्याच्या बोलण्याची किंवा दैनंदिन सवयींची माहिती बाहेरील कंपन्यांपर्यंत पोहोचण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे वैयक्तिक माहितीची गोपनीयता राखण्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकतो.
हेदेखील वाचा: व्हॉट्सॲपवरून थेट शेअर करता येणार इन्स्टाग्राम रील्स; पाहा नव्या फीचरची वैशिष्ट्ये
मायक्रोकंट्रोलर आणि रिले मॉड्यूल्सचा वापर
ही स्मार्ट होम प्रणाली मायक्रोकंट्रोलर, ऑफलाइन स्पीच रिकग्निशन चिप आणि रिले मॉड्यूल्सच्या साहाय्याने कार्य करते. मायक्रोफोनद्वारे दिलेली व्हॉइस कमांड प्रणाली स्वीकारते. त्यानंतर आधीपासून साठवलेल्या सूचनांशी तिचा मेळ घालून संबंधित उपकरणाला नियंत्रणाचा संदेश दिला जातो. ही प्रक्रिया अत्यंत कमी वेळेत पूर्ण होत असल्याने वापरकर्त्याला त्वरित प्रतिसाद मिळतो.
इंटरनेट कनेक्शनवर अवलंबून राहावे लागत नसल्यामुळे इंटरनेटची सुविधा मर्यादित किंवा उपलब्ध नसलेल्या ठिकाणीही अशा प्रणालीचा उपयोग होऊ शकतो. तसेच, स्थानिक पातळीवर प्रक्रिया होत असल्याने प्रतिसादाचा वेग वाढण्यास मदत होते.
सोर्स कोड आणि सर्किटची माहिती GitHub वर
या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्याने इतर तंत्रज्ञानप्रेमी आणि नवोदित संशोधकांनाही अशा प्रकारची उपकरणे तयार करता यावीत, या उद्देशाने त्याचा सोर्स कोड आणि सर्किटशी संबंधित सविस्तर माहिती GitHub या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिली आहे.
अवघ्या १६व्या वर्षी इंटरनेटशिवाय कार्य करणारी स्मार्ट होम प्रणाली विकसित करण्याचा या विद्यार्थ्याचा प्रयत्न लक्षवेधी ठरत आहे. स्मार्ट होम तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराच्या काळात इंटरनेटवरील अवलंबित्व कमी करणे, वापरकर्त्याची गोपनीयता जपणे आणि कमी खर्चात स्वयंचलित घराची संकल्पना प्रत्यक्षात आणणे या दृष्टीने ‘जार्विस’सारखे प्रयोग महत्त्वाचे ठरू शकतात.
