व्हॉट्सॲपमध्ये इन्स्टाग्राम रील शेअर करण्यासाठी नवा शॉर्टकट येणार आहे. रिसेंट, सेव्ह्ड आणि लाईक्ड असे तीन टॅब असलेल्या या फीचरची सध्या अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी चाचणी सुरू आहे.
मुंबई : इन्स्टाग्रामवर एखादी आवडलेली किंवा मजेशीर रील पाहिल्यानंतर ती मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांसोबत शेअर करण्यासाठी आता अधिक सोपा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सॲप आपल्या चॅटमध्येच इन्स्टाग्राम रील शेअर करण्यासाठी स्वतंत्र शॉर्टकट आणण्याच्या तयारीत आहे. या नव्या फीचरमुळे इन्स्टाग्रामवर पाहिलेल्या रील्स थेट व्हॉट्सॲप चॅटवर पाठवता येणार आहेत. सध्या या सुविधेची काही निवडक अँड्रॉइड बीटा युजर्सकडून चाचणी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.26.42.9 मध्ये या नव्या फीचरची माहिती समोर आली आहे. यामध्ये कोणत्याही चॅटमधील अटॅचमेंट मेन्यूमध्ये ‘रील्स’ असा स्वतंत्र पर्याय दिला जाणार आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर युजर्सना इन्स्टाग्रामवरील रील्स शोधता येतील आणि आवडलेला व्हिडिओ थेट संबंधित व्हॉट्सॲप चॅटमध्ये शेअर करता येईल. त्यामुळे रील डाउनलोड करणे किंवा ती शेअर करण्यासाठी वेगळा पर्याय शोधण्याची गरज कमी होणार आहे.
तीन स्वतंत्र टॅबमध्ये मिळणार रील्स
या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ‘रिसेंट’, ‘सेव्ह्ड’ आणि ‘लाईक्ड’ असे तीन स्वतंत्र टॅब असतील. ‘रिसेंट’ विभागात अलीकडेच इन्स्टाग्रामवर पाहिलेल्या रील्स दिसतील. ‘सेव्ह्ड’ टॅबमध्ये सेव्ह करून ठेवलेले व्हिडिओ, तर ‘लाईक्ड’ विभागात युजर्सनी लाईक केलेल्या रील्स पाहता येतील. या पर्यायांमधून हवा तो व्हिडिओ निवडून थेट व्हॉट्स-ॲपवर पाठवता येईल. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी पाहिलेली रील पुन्हा शोधण्यासाठी इन्स्टाग्राममध्ये जाण्याचीही आवश्यकता भासणार नाही.
अकाउंट्स सेंटरशी लिंक करावे लागणार अकाउंट
या नव्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी युजर्सना आपले व्हॉट्सॲप अकाउंट मेटाच्या ‘अकाउंट्स सेंटर’शी लिंक करावे लागणार आहे. यामुळे व्हॉट्स-ॲप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या प्लॅटफॉर्मदरम्यान कंटेंट शेअर करणे अधिक सोयीचे होईल. मात्र, अकाउंट लिंक करणे अनिवार्य नाही. ज्यांना आपले व्हॉट्सॲप अकाउंट इन्स्टाग्राम आणि फेसबुकपासून स्वतंत्र ठेवायचे आहे, ते पूर्वीप्रमाणेच व्हॉट्सॲपचा वापर करू शकतील. मात्र, त्यांना हा नवा रील शेअरिंग शॉर्टकट उपलब्ध होणार नाही.
सर्व युजर्सना मिळण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा
सध्या हे फीचर केवळ निवडक अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. चाचणीदरम्यान मिळणाऱ्या प्रतिसादानुसार त्यात बदल केले जाऊ शकतात. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व युजर्ससाठी ते उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हॉट्स ॲपवरून थेट इन्स्टाग्राम रील शेअर करण्यासाठी सामान्य युजर्सना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
