जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात तयारी सुरू. प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या, प्रशिक्षण, स्व-गणना आणि ४० प्रश्नांच्या आधारे लोकसंख्या गणनेचे नियोजन.
मुंबई : जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे काम प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे. जनगणनेच्या निर्धारित वेळापत्रकानुसार सूक्ष्म नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक झाली. या बैठकीत जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या नियोजनासह मनुष्यबळाची उपलब्धता, प्रशिक्षण, स्व-गणना आणि क्षेत्रीय कामकाजाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
मार्च २०२७ पर्यंत विविध उपक्रम राबविणार
राज्यात जनगणना-२०२७ चा पहिला टप्पा म्हणजेच घरयादी व घरगणनेचे काम मे-जून २०२६ या कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण, प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या, प्रशिक्षणाची पुढील प्रक्रिया, स्व-गणना आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाचे नियोजन सुरू आहे. हे सर्व उपक्रम मार्च २०२७ पर्यंत राज्यभर राबविण्यात येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आपापल्या कार्ययोजना जनगणनेच्या वेळापत्रकाशी सुसंगत ठेवाव्यात आणि कामात कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

प्रगणक, पर्यवेक्षकांच्या नियुक्त्यांवर भर
जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने गृह रक्षक दल, वन विभाग, जिल्हा परिषद आणि शिक्षकांसह अन्य पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित जिल्हास्तरीय कार्यालयांनी नियुक्तीसाठी पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी तयार करून संबंधित जनगणना चार्ज अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून द्यावी. तहसीलदार, मुख्याधिकारी आणि वॉर्ड अधिकारी यांच्यामार्फत नियुक्ती प्रक्रियेला आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठीही नियोजन करण्यात येत आहे.
दुसऱ्या टप्प्यात विचारले जाणार ४० प्रश्न
भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त कार्यालयाने १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या अधिसूचनेद्वारे जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यात विचारण्यात येणाऱ्या ४० प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे. ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात ३ सप्टेंबर २०२६ रोजी पुनर्प्रकाशित करण्यात आली आहे.
जनगणनेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी राज्यात स्थानिक पातळीवर जनजागृती आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःची आणि कुटुंबाची स्व-गणना करावी, यासाठी त्यांना प्रोत्साहित करणारे आवाहन करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्याचा आढावा
बैठकीत जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालिका तथा केंद्र शासनाच्या सहसचिव डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा, त्यातून समोर आलेले महत्त्वाचे निष्कर्ष आणि दुसऱ्या टप्प्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती दिली.
या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीचे सदस्य आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
