आठ वर्षांपासून बंद असलेला जतचा घनकचरा प्रकल्प अखेर सुरू; टिकाकारांना नगराध्यक्ष डॉ. आरळींचे प्रत्युत्तर

जत : जत नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पावरून सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवून नगरपरिषदेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी केला. घनकचरा प्रकल्पात ५० लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप तथ्यहीन असून, प्रत्यक्षात ३६ लाखांचे बिल नियमानुसार वाटप करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आठ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला कोट्यवधी रुपयांचा घनकचरा प्रकल्प आता कार्यान्वित करण्यात आला असून, ओला व सुका कचरा विघटन प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती डॉ. आरळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम ताड, सभापती गौतम ऐवाळे, फिरोज नदाफ, मिथुन भिसे, परशुराम मोरे, प्रमोद हिरवे आणि अनिल पाटील उपस्थित होते.
डॉ. आरळी यांनी सांगितले की, नगरपरिषदेची सूत्रे हाती घेऊन अवघे चार महिने झाले असले तरी शहर विकासासाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर विकासकामांना गती देण्यात येत आहे. डिसेंबरअखेर पाणीपुरवठा योजना पूर्ण होणार असून, स्वच्छतेसाठी नव्या घंटागाड्यांची खरेदी करण्यात आली आहे.
तसेच शहरासाठी स्वतंत्र अभ्यासिका मंजूर झाली असून, नगरपरिषदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन लवकरच होणार आहे. नमो गार्डनसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, गंधर्व नदी विकासाचा प्रस्ताव तयार केला जात आहे. शहरातील मच्छी व मटण मार्केट अन्य ठिकाणी हलविण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
“जशास तसे उत्तर देऊ” : सभापती गौतम ऐवाळे
सभापती गौतम ऐवाळे यांनी काही मंडळी नगरपरिषदेला जाणीवपूर्वक बदनाम करत असल्याचा आरोप केला. “आम्ही संयम बाळगतोय म्हणजे आम्ही दुबळे नाही. यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
नगरसेवक परशुराम मोरे यांनी सांगितले की, आठ वर्षांपासून बंद असलेला घनकचरा प्रकल्प नगराध्यक्ष व त्यांच्या टीमच्या प्रयत्नांमुळे सुरू झाला असून, आता कचरा विघटन प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू आहे.
लिंगायत स्मशानभूमीची नोंदच नसल्याचा गौप्यस्फोट
उमराणी रोडवरील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची नगरपरिषद दप्तरी आजपर्यंत नोंदच नसल्याचा गौप्यस्फोट डॉ. आरळी यांनी केला. २०१२ पासून कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी त्याची नोंद केली नसल्याचे त्यांनी सांगितले. आता संबंधित जागेची अधिकृत नोंद करून स्मशानभूमीचा विकास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय दर्जासाठी माडग्याळ मेंढी सज्ज; केंद्रीय शास्त्रज्ञ २५ व २६ मे रोजी जत तालुक्यात

जत : जत तालुक्याची ओळख बनलेली माडग्याळ मेंढी आता राष्ट्रीय स्तरावरील मान्यतेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या मेंढीच्या जातीच्या नोंदणी प्रक्रियेला अंतिम टप्पा गाठला असून, केंद्रीय शास्त्रज्ञांची टीम २५ व २६ मे रोजी जत तालुक्यातील विविध गावांना भेट देणार आहे.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो (NBAGR), करनाल तसेच केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ या पाहणी दौऱ्यात सहभागी होणार आहेत. डॉ. महेश डिगे आणि डॉ. सारवनन यांच्या नेतृत्वाखालील पथक निवडक मेंढपाळांच्या मेंढ्यांची पाहणी करणार आहे.
माडग्याळ मेंढीची उत्कृष्ट वजनवाढ, दुष्काळी परिस्थितीत तग धरण्याची क्षमता, मजबूत शरीरयष्टी आणि लांब पल्ल्याच्या स्थलांतराची क्षमता यामुळे पशुपालन क्षेत्रात या जातीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दर्जेदार मटण उत्पादनासाठीही ही जात प्रसिद्ध आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाने पशुसंवर्धन विभागाला याबाबत पत्र पाठवले असून, उच्च गुणवत्तेच्या मेंढ्यांचे रक्त व इतर जैविक नमुने संकलित करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शास्त्रज्ञांकडून मेंढ्यांची शरीररचना, रंग, उंची, अनुवंशिक वैशिष्ट्ये आणि पालन पद्धतीचा अभ्यास केला जाणार आहे.
या सर्व माहितीच्या आधारे माडग्याळ मेंढीच्या राष्ट्रीय नोंदणीसाठी अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे.
या गावांना शास्त्रज्ञांच्या भेटी
२५ व २६ मे रोजी खैराव, आबाचीवाडी, लकडेवाडी, दरीबडची, कोसारी, रेवनाळ, अचकनहळ्ळी, शेगाव, कुलाळवाडी, बागेवाडी, वळसंग, सिद्धनाथ आणि मुचंडी या गावांना शास्त्रज्ञांची टीम भेट देणार आहे.
