sangli crime news

sangli crime news: मिरज येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावट मद्य तस्करीवर मोठी कारवाई करत १६.१५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिरज,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
गोवा बनावट मद्याच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज विभागाने मोठी धडक कारवाई करत एक गुन्हा नोंदवून तब्बल १६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राजेश देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच प्रसाद सुर्वे, सहआयुक्त दक्षता व अंमलबजावणी यांच्या आदेशानुसार आणि विजय चिंचाळकर, विभागीय उपायुक्त (कोल्हापूर विभाग) व प्रदीप पोटे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

sangli crime news

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मिरज–पंढरपूर रोडवरील महामार्ग क्र. १६६ वर हॉटेल सरपंचसमोर सापळा रचून स्विफ्ट डिझायर (क्र. MH 14 GS 4209) या चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत महसूल चुकवून गोवा राज्यात तयार करण्यात आलेले बनावट विदेशी मद्य अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे आढळून आले. या कारवाईत सुमारे १ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा, तीन मोबाईल फोन व वाहनासह ११ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यानंतर आरोपींच्या सखोल चौकशीत गोवा बनावट मद्याचे लेबल सोलापूर जिल्ह्यातील शिरभावी (ता. सांगोला) येथे तयार होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जत व पंढरपूर येथील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शिरभावी येथील बापू मोहन होवाळ (रा. खेडकर मळा, रोड होवाळ वस्ती) यांच्या घरी छापा टाकण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट मद्य निर्मिती केंद्र आढळून आले. तेथून विविध प्रकारच्या विदेशी मद्याच्या बाटल्या, बुचे, रिकाम्या बाटल्या असा ४ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेदेखील वाचा: miraj crime news: रेल्वे तिकिटावरून उकललं मिरजमधील महिला हत्येचं गूढ: दुसरा पती व सासऱ्याचा सहभाग; दोघांनाही हरियाणा व उत्तर प्रदेशातून अटक

या संपूर्ण कारवाईत वाहनासह एकूण १६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात सावंता विजय खोत (रा. कोगनोळी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), आकाश नामदेव खोत (रा. चाबुकस्वारवाडी, ता. मिरज), सुनील दादासो खोत (रा. चाबुकस्वारवाडी, ता. मिरज), बापू मोहन होवाळ (रा. शिरभावी, ता. सांगोला, जि. सोलापूर) या चार आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई), (एफ), ८०, ८१, ८३ व ९० अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना जागीच अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत निरीक्षक दिपक बाळकृष्ण सुपे (मिरज), प्रभात सावंत (जत), पंकज कुंभार (पंढरपूर), दुय्यम निरीक्षक अजय लोंढे, लक्ष्मण पोवार, जयसिंग खुटावळे, बापू चव्हाण तसेच जवान स्वप्नील अटपाडकर, विनायक खांडेकर, संतोष बिराजदार, कविता सुपने, शाहीन शेख व वाहनचालक स्वप्नील कांबळे यांनी सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक दिपक बाळकृष्ण सुपे, राज्य उत्पादन शुल्क, मिरज करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *