🌸 इचलकरंजीतील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी प्रोफेसर डॉ. त्रिशला कदम यांची पुनर्नियुक्ती. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदानाबद्दल संस्थेचा त्यांच्यावर विश्वास.
इचलकरंजी,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी प्रोफेसर डॉ. त्रिशला कदम यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत असताना डॉ. कदम यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थिनींच्या मनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात विविध उपक्रम, विद्यार्थी हिताचे कार्यक्रम आणि विकासकामे राबवली गेली आहेत.
जून 2022 ते जुलै 2024 या कालावधीत प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या, तसेच शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी अनेक नवकल्पना राबवल्या. त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाने अनेक क्षेत्रात प्रगती साधली होती.
संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, माजी प्राचार्य डॉ. शैलजा साळुंखे, सचिव सौ. शुभांगी गावडे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.

डॉ. कदम या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असून, याच संस्थेत त्यांनी प्राध्यापक म्हणून तसेच प्रभारी प्राचार्य म्हणून कार्य केले आहे. शिक्षण, नेतृत्व आणि प्रगतिशील विचारांची सांगड त्यांच्या कार्यातून दिसून येते.
प्रभारी प्राचार्य म्हणून पुन्हा जबाबदारी स्विकारल्याबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
